Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 26 October 2009

सरकारला पाझर फुटेना, शिक्षकांना न्याय मिळेना

चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच

बहुजन समाज नेत्यांसमोर आव्हान


पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)- "" गेले चार दिवस आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या शिक्षकांची ही दारुण परिस्थिती पाहून एव्हाना पाषाणालाही पाझर फुटला असता पण केवळ आपले नातेवाईक व पाठीराख्यांचीच तळी उचलून धरण्यासाठी सत्तेचा उपभोग घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अजूनही जाग येत नाही. परमेश्वराचीही केवळ मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावरच कृपादृष्टी असावी. मुख्यमंत्र्यांकडून आमच्या मुलांवर अन्याय होतो आहे याचे त्या परमेश्वरालाही काहीच पडून गेलेले नाही की काय.'' आपल्या मुलावर झालेल्या अन्यायाविरोधात इथे गेले चार दिवस तळतळणाऱ्या लीला कोटकर या मातेकडून हा आक्रोश आजही सुरू होता.
लोकसेवा आयोगाने निवड करूनही गेल्या चार महिन्यांपासून सरकारच्या नाकर्तेपणाचे बळी ठरलेल्या त्या "५२' शिक्षकांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस सरला. राज्य मंत्रिमंडळातील एकाही सदस्याने इथे तोंडही दाखवले नाही. विद्यमान आघाडी सरकारातील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी मात्र याठिकाणी हजेरी लावून या शिक्षकांची विचारपूस केली. भावी पिढी घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांवर ही वेळ ओढवणे हे आपल्याला अजिबात मान्य नाही व या घटनेमुळे आपण व्यथित झाल्याचे ते म्हणाले. सरकार पक्षातील एक आमदार या नात्याने आपल्या भावना मुख्यमंत्री कामत यांच्यापर्यंत पोचवण्यापलीकडे आपल्या हातात काहीही नाही,अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.

बहुजन समाज नेत्यांसमोर आव्हान
दरम्यान, निवड झालेल्या या शिक्षकांत बहुतांश उमेदवार हे बहुजन समाजातील आहेत. पात्रता व गुणवत्तेच्या आधारावर निवडण्यात आलेल्या या शिक्षकांची अशा पद्धतीने हेळसांड सुरू असल्यामुळे बहुजन समाजातील नेत्यांसमोरही आव्हान उभे ठाकले आहे. प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा बहुजन समाजाचे नेते विष्णू वाघ यांनी काल या उमेदवारांची भेट घेतली असता उमेदवारांनी व्यक्त केलेला रोष त्यांच्या जिव्हारी लागल्याची खबर आहे. अखिल गोवा भंडारी समाजाचे अध्यक्ष मधुकर पोकू नाईक व विष्णू वाघ यांनी आज याठिकाणी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. समाजातील सर्व नेत्यांचे या गोष्टीकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे चर्चा करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी यावेळी उपोषणकर्त्या शिक्षकांना सांगितले. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी उमेदवारांना दिले. "गोवा बचाव अभियाना'चे नेते डॉ.ऑस्कर रिबेलो यांची उपस्थिती या उपोषणकर्त्यांसाठी आल्हाददायक ठरली. शिक्षकांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवला व अखेरपर्यंत माघार न घेण्याचा सल्लाही दिला.
येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात संयुक्त कामगार संघटनांतर्फे आयोजित केलेल्या अधिवेशनाला जमलेल्या विविध कामगार नेत्यांनी याठिकाणी आंदोलक शिक्षकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. यावेळी प्रा.भट, दामोदर घाणेकर, उत्तर गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर, स्वातंत्र्यसैनिक सदानंद काणेकर, गोकुळदास प्रभू आदींनी भेट देऊन या शिक्षकांची विचारपूस केली व त्यांना पाठिंबा दिला. सत्ताधारी पक्षातील आमदार नीळकंठ हळर्णकर वगळता एकही आमदार किंवा मंत्री इथे फिरकला नाही. बाकी सत्ताधारी पक्षांचे काही पदाधिकारी इथे घुटमळतात खरे पण आपल्याच निर्ढावलेल्या सरकारला जागे करण्याची खरोखरच त्यांच्यात ताकद आहे काय,अशी चर्चा याठिकाणी भेट देणाऱ्या इतरांकडून सुरू होती. उपोषणकर्त्यामध्ये महिलांचा भरणा असूनही एकाही महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची विचारपूस न केल्याबद्दल आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.
बाबुश यांचे वक्तव्य दुर्दैवी
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सुरुवातीला लोकसेवा आयोगाची निवड मान्य केली होती व या शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही,अशी भूमिका मांडली होती. आज ते मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सुरात सुर मिसळवत आहेत.लोकसेवा आयोगाने केलेली निवड योग्य नाही तर ते पटवून द्या व आयोगच गुंडाळा,अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे. निवड न झालेल्या उमेदवारांची बाजू ऐकून घेण्याची भाषा करणाऱ्या नेत्यांनी विविध सरकारी खात्यांत केवळ आपापल्या मतदारसंघातील लोकांची भरती करताना डावलण्यात आलेल्या उमेदवारांची बाजू ऐकून घेतली होती काय,असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. पात्रता व गुणवत्तेच्या आधारावर निवडलेल्या या यादीत आपल्या मर्जीतील लोकांचा समावेश नाही म्हणून मुख्यमंत्री कामत हे या निवडलेल्या शिक्षकांशी खेळ करतात हा चुकीचा पायंडा आहे व त्याचे परिणाम भविष्यात सरकारलाच भोगावे लागतील,असेही या उमेदवारांनी सांगितले.

No comments: