शिक्षकांचे उपोषण सुरूच
पणजी, दि.२७ (प्रतिनिधी) - गोवा लोकसेवा आयोगाने शिफारस करूनही "५२' शिक्षकांच्या नियुक्तीस सरकार राजी नसल्याच्या निषेधार्थ गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणावर बसलेल्या शिक्षकांकडे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पाठ फिरवली असली तरी अखेर शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याने या शिक्षकांच्या जिवात जीव आला आहे. या शिक्षकांवर अजिबात अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी बाबूश यांनी दिले परंतु या "५२' शिक्षकांची नियुक्ती होणार याची हमी मात्र त्यांनी देण्यास नकार दर्शवल्याने या शिक्षकांनी आपले उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
आज संध्याकाळी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उपोषणकर्त्या शिक्षकांची भेट घेतली असता सहा दिवसांपासून तळतळणाऱ्या या शिक्षकांच्या डोळ्यांतून एकच अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.खुद्द बाबूश यांनी सुरुवातीला ही यादी आपल्याला मंजूर असल्याचे विधान केले होते तसेच या शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही,असेही सांगितले होते पण आता त्यांनी आपली भूमिका का बदलली असा सवालच त्यांना या शिक्षकांनी केला. यावेळी बाबूश यांनी आपली बाजू स्पष्ट करताना या यादीत समावेश होऊ न शकलेल्या उमेदवारांनी लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेबाबत काही हरकती दाखल केल्या आहेत व या हरकतींबाबत आयोगाकडे स्पष्टीकरण मागितल्याचे सांगितले.या हरकतींची चौकशी केल्यानंतर दोन्ही गटांची बाजू एकून घेऊ व नंतरच अंतिम निर्णय घेऊ असे आश्वासन बाबूश यांनी केले.दरम्यान, आयोगाने निवड करून आता चार महिने उलटले व आता या यादीबाबत संशय व्यक्त करणे यात काहीतरी काळेबेरे असून केवळ आपल्या मर्जीतील उमेदवारांचा समावेश या यादीत होऊ शकला नाही म्हणूनच हा डाव आखला जात असल्याचे यावेळी संतप्त शिक्षकांनी सांगितले. निवड झालेल्या शिक्षकांची आपल्याला पूर्ण सहानुभूती असल्याचे यावेळी शिक्षणमंत्री यांनी सांगितले.लोकसेवा आयोगाने केलेली शिफारस फेटाळण्याचे यापूर्वी अनेकवेळा प्रकार घडले आहेत त्यामुळे हा पहिलाच प्रकार नाही,असेही बाबूश यांनी सांगितले.दरम्यान, बाबूश यांनी यावेळी या उमेदवारांवर अन्याय होऊ देणार नाही अशी हमी दिली असली तरी या "५२' शिक्षकांना न्याय मिळेल काय,असे विचारले असता ते त्याबाबत ठामपणे काहीही सांगू शकले नाही. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या शिक्षकांच्या शिष्टमंडळाला जे काही सुनावले आहे ते पाहता या यादीतील किमान आठ ते दहा उमेदवारांना वगळण्याचा त्यांचा बेत असल्याचे स्पष्ट होते असे यावेळी या शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले. मुख्यमंत्र्यांकडे तक्रारींचा तगादा लावलेल्या एका शिक्षिकेची बाजू मांडून ते निवड झालेल्या उमेदवारांना डावलत असल्याचेही यावेळी या शिक्षकांनी बाबूश यांना सांगितले. हा विषय येत्या मंत्रिमंडळ बैठकीत अवश्य घेऊ व तोडगा काढू,असे आश्वासन यावेळी बाबूश यांनी दिले. आज याठिकाणी या शिक्षकांना भेट दिलेल्यांत भाजप आमदार दिलीप परूळेकर, दयानंद सोपटे,जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर,अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष संतोबा देसाई, माजी लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अरविंद भाटीकर, गोविंद गावडे आदींचा समावेश होता.बाकी आजही शिवसैनिकांनी उपस्थित राहून या शिक्षकांना पाठिंबा दर्शवला.
बाबूश यांच्यासमोरच एक शिक्षिका कोसळली
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात हे भेटीसाठी आले आहेत या कल्पनेमुळेच उपोषणकर्त्या शिक्षकांच्या डोळ्यांतून ढळाढळा अश्रू वाहू लागले.अतिभावनाविवश झालेली एक शिक्षिका यावेळी त्यांच्यासमोरच कोसळल्याने तात्काळ "१०८' रुग्णवाहिका मागवून तिला गोमेकॉत पाठवण्यात आले. हे दृष्य पाहून बाबूश यांनी या शिक्षकांना आपले उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला. ही पद्धत चुकीची असल्याचे ते म्हणाले व या कृतीमुळे विद्यार्थ्यांसमोर शिक्षक काय संदेश ठेवणार आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी या शिक्षकांनी या कृतीमुळे विद्यार्थ्यांना एकदम चांगला संदेश मिळणार असून अन्याय सहन न करता त्याविरोधात एकजुटीने लढण्याचाच या आंदोलनातून संदेश पोहचल्याचे सांगितले.
आयोगाची शिफारसच चुकीची
दरम्यान, आयोगाच्या शिफारशीत समावेश होऊ न शकलेल्या उमेदवारांनी आज पणजी येथे पत्रकार परिषद घेऊन ही निवड प्रक्रिया पूर्णपणे चुकीची असल्याचा आरोप केला.आमरण उपोषणाला बसलेल्या शिक्षकांच्या दबावाला सरकारने अजिबात बळी पडू नये. या निवड प्रक्रियेची चौकशी करून नव्याने निवड करावी,अशी मागणी केली. यावेळी कल्पिता वसंत कामत या उमेदवाराने आपला अनुभव सांगताना तोंडी परीक्षेला सुरुवातीला केवळ विषयासंबंधात प्रश्न विचारणार असे सांगितले होते पण प्रत्यक्षात मात्र तिथे वेगळेच प्रश्न विचारण्यात आल्याची टीका केली. आपल्याला महानंद नाईक याच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. महानंद नाईक व आपल्या विषयाचा संबंध काय,असा प्रश्न यावेळी तिने पत्रकारांना विचारला.आपण "पीएचडी' पूर्ण केलेली एकमेव उमेदवार असूनही आपली निवड झाली नाही,असे सांगून ही यादीच चुकीची असल्याचे त्या म्हणाल्या. याप्रकरणी लेखी परीक्षेपेक्षा तोंडी परीक्षेला महत्व देण्यात आल्याचे सांगून या सर्व गोष्टी मुख्यमंत्री दिगंबर कामत,शिक्षणमंत्री व विरोधी पक्षनेत्यांच्या नजरेस आणून दिल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी काही उमेदवार हजर होते.
Wednesday, 28 October 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment