Tuesday, 20 October 2009
मालगोंडा, योगेश मुख्य आरोपी
पोलिसांचा दावा
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी)- मडगाव स्फोट प्रकरणाचे मुख्य संशयित आरोपी मयत मालगोंडा पाटील व इस्पितळात मृत्यूशी झुंज देणारा योगेश नाईक हेच असल्याची माहिती आज पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी दिली. त्यांना गर्दीच्या ठिकाणी हा स्फोट घडवून आणायचा होता, हे आत्तापर्यंतच्या तपासात उघड झाले असून गेल्यावर्षी ठाणे, वाशी (नवी मुंबई) व पनवेल येथे झालेल्या स्फोटाचे मडगाव शहरात झालेला बॉंबस्फोटाशी बरेच साम्य असल्याचा दावा त्यांनी केला. सनातन संस्थेचे विश्वस्त विरेंद्र मराठे व सनातन प्रभात या मुखपत्राचे संपादक पृथ्वीराज हजारे यांची चौकशी करण्यात आली आहे. या कटात किती जणांचा समावेश आहे याचा तपास सुरू असून अन्य काही संघटनांवरही लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, हा स्फोट होऊन चार दिवस उलटले तरी, एकाही व्यक्तीला अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे गेल्या चार दिवसांत पाच से सहावेळा रामनाथी येथील संशयाच्या घेऱ्यात आलेल्या सनातन संस्थेच्या आश्रमात पोलिसांच्या हाती नक्की काय आणि किती महत्त्वाच्या गोष्टी हाती लागल्या यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. मडगाव येथे झालेला स्फोट आणि सांखवाळ येथे सापडलेला बॉंब याविषयीचा तपास पोलिस अधीक्षक ओमप्रकाश कुडतडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खास स्थापन करण्यास आलेले विशेष पथक करीत असून त्यांना मुंबई पोलिसांचे "एटीएस' पथक सहकार्य करीत आहे.
मडगाव येथील स्फोटात वापरण्यात आलेले जिलेटिन हे नागपूर येथील सूरज एक्स्प्लोझीव लिमिटेड या कंपनीत तयार करण्यात आले असून सदर जिलेटिनची कांडी कोण घेऊन गेला होता, याची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक नागपूर येथे दाखल झाले आहे. त्याचप्रमाणे मयत मालगोंडा याच्या गावी सांगली येथे एक पोलिस पथक पाठवण्यात आले असून मालगोंडा हा या संस्थेचा सक्रिय कार्यकर्ता होता, अशी माहिती उपलब्ध झाली असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले. स्फोटाच्या आठ दिवस पूर्वी तो सांगली येथे होता तर, मीरज - सांगली दंगलीच्यावेळीही मालगोंडा पाटील सुमारे २० दिवस त्याठिकाणी तळ ठोकून होता, अशी माहिती हाती आल्याचे ते म्हणाले.
हा स्फोट घडवून आणण्यात किती जणांचा सहभाग होता, हे पुढे होणाऱ्या चौकशीअंती उघड होणार असल्याचे सांगत या प्रश्नावर कोणाचे नावे घेणे श्री. यादव यांनी टाळले. सांकवाळ येथे ट्रकात कोणी स्फोटके आणून ठेवली, याचा तपास सुरू आहे. सदर ट्रक फोंडा येथून काही तरुणांना घेऊन वास्को येथे नरकासूर पाहण्यासाठी गेला होता. त्यात चाळीस तरुण फोंड्याहून गेले होते. त्या सर्वांची चौकशी करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गृहमंत्री रवी नाईक यांनी मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या पत्नीचा या आश्रमात सक्रिय वावर असल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्री. यादव यांना विचारले असता, पोलिस चौकशी कायद्याला धरून आणि समोर येणाऱ्या पुराव्यावरून केली जाणार आहे. त्यावेळी कोण किती शक्तिशाली आणि कमजोर आहे हे पाहिले जाणार नाही. कोणीही व्यक्ती या जिलेटिन स्फोटात दोषी असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
डॉ. आठवले यांची चौकशी होणार
सनातन संस्थेचे संस्थापक प. पू. डॉ. जयंत आठवले हे आजारी असल्याचे आश्रमातून सांगण्यात येत असल्याने अद्याप त्यांच्याशी भेट झालेली नाही. त्यामुळे संस्थेचे प्रमुख या नात्याने त्यांचीही या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. तसेच, दि. २४ ऑक्टोबर रोजी ते विदेशात होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणार असल्याने गरज भासल्यास त्यांना स्थानबद्ध केले जाणार असेही श्री. यादव यांनी सांगितले.
स्फोटापूर्वीच मालगोंडाची "सीआयडी'कडून चौकशी?
स्फोट होण्याच्या पाच दिवसांपूर्वी म्हणजे दि. ११ ऑक्टोबर रोजी फोंडा पोलिस स्थानकातील गुप्तचर विभागाचे उपनिरीक्षक प्रकाश गिरी यांनी आश्रमात दूरध्वनी करून मालगोंडा पाटील याची चौकशी केली होती. केवळ आश्रमात विदेशी व्यक्ती आहे का, हे विचारण्यासाठी तो दूरध्वनी केला होता. मालगोंडा असे काही करणार याची कोणताही माहिती पोलिसांकडे नव्हती, असे स्पष्टीकरण आज उपमहानिरीक्षक यादव यांनी दिले.
आश्रमावर बंदी घालणार का, असे विचारले असता तो विषय आमचा नसून सरकार त्यावर निर्णय घेणार आहे. आम्ही काय तो अहवाल सरकारला सादर केला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या दोन दिवसात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फ्रेंच कुटुंब
आश्रमात फ्रान्स येथील एक कुटुंब साधक म्हणून राहत असल्याचे उघडकीस आले असून त्यांची माहिती देणारे "सी फॉर्म' भरून दिले नसल्याने आश्रमाच्या जबाबदार व्यक्तीवर कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी श्री. यादव यांनी सांगितले. कोणत्याही संस्थेत किंवा आश्रमात विदेशी व्यक्ती राहत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. या आश्रमात एक पुरुष, महिला व त्यांचे मूल राहत आहे. गेल्या ३० जून ०९ रोजी हे कुटुंब मुंबईमार्गे गोव्यात दाखल झाले होते.
साधकांना संरक्षण देण्याची मागणी
फोंडा, दि. १९ (प्रतिनिधी)ः बॉंबस्फोटानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रम प्रमुखांनी फोंडा पोलिसांकडे आज (दि.१९) एक निवेदन सादर करून आश्रमातील साधकांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
मडगाव येथील बॉंबस्फोट प्रकरणी सरकारी पोलिस यंत्रणेकडून सनातन संस्थेवर संशय घेतला जात आहे. तसेच सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाची पोलिसांनी छापे घालून तपासणी करून काही ऐवज ताब्यात घेतला आहे. बॉंबस्फोटासारख्या प्रकरणात सनातन संस्थेवर संशय घेण्यात येत असल्याने काही लोकांनी रविवारी रात्री आश्रमाच्या बाहेर एकत्र होऊन सनातन संस्थेच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून संस्थेवर बंदी आणावी, अशी मागणी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली
मडगाव येथील स्फोटानंतर सनातनवर संशय घेण्यात येत असल्याने काही जणांकडून धमक्या येत असल्याने साधकांच्या संरक्षणासाठी पोलिस संरक्षण देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
योगेश नाईक जिवंत
स्फोटात जखमी झालेला योगेश नाईक अद्याप जिवंत असून प्रसारमाध्यमांनी तो मृत झाल्याचे दिलेले वृत्त निराधार आहे. योगेश हा आश्रमात दूध घालण्याचे तसेच सनातन प्रभात हे मुखपत्र वितरित करण्याचेही काम करीत होता. त्याचप्रमाणे आश्रमात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय भाग घेत होता. ज्या स्कूटरमध्ये स्फोट झाला ती इटर्नो स्कूटर योगेशचा भाऊ सुरेश नाईक याच्या नावावर आहे. त्यामुळे सुरुवातीला स्कूटरचा मालक म्हणून ज्याचे नाव जाहीर झाले ते चुकीचे असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी, वाहतूक खात्यातील कागदपत्रांनुसार ती स्कूटर २२ हजार रुपयांत सुरेश याला विकण्यात आल्याचे उघडकीस आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment