Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 22 October 2009

गोव्यातील टोळीची दुष्कृत्ये मुंबईतही

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): राज्यात गाजलेल्या खूनसत्रप्रकरणी अटक करण्यात आलेल्या टोळक्याने गोव्यात अजून काही खून केल्याची शक्यता असून त्यांनी विरार ठाणे मुंबई येथे एका महिलेचा अशाच पद्धतीने खून केल्याची कबुली आज गुन्हा अन्वेषण विभागाला दिली. दि. १८ रोजी विरार येथे एकदम कुजलेल्या स्थितीत त्या मृतदेह आढळून आला असून ठाणे पोलिस या दोन दिवसात अधिक चौकशीसाठी गोव्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी आज दिली. सदर ही महिला मुंबई येथे चंद्रकांतची पत्नी ग्रेश्मा हिच्या शेजारीच राहत होती, अशी माहिती मिळाली आहे.
सायरन याच्या अल्पवयीन प्रेयसीचा या खून सत्रात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून या टोळीत आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले. राज्यात चार महिलांचे खून करण्यामागे कोणता हेतू होता, या खुनामागे केवळ चोरी हा एकच उद्देश होता का, आणि अशा अनेक प्रश्नांचा उलगडा अद्याप झालेला नाही. घरून काही अंतरावर असलेल्या दुकानावर कामाला जाणाऱ्या शर्मीला मांद्रेकर या तरुणीच्या अंगावर किती किमतीचे दागिने होते ज्यामुळे तिचा खून करण्यात आला, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या टोळीला आधीपासून ओळखणारी एविटा हिच्या गळ्यातील सोनसाखळी यापूर्वी सायरन याच्या मित्राने चोरली होती. मग, तिचा खून का करण्यात आला, याचेही कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एविटा ही सायरन हिच्या प्रेयसीला बऱ्यापैकी ओळखत होती, अशी माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली आहे.

No comments: