Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 22 October 2009

'सर्च' वॉरंटला कोर्टाचा नकार

सनातनप्रकरणी तपास यंत्रणेला चपराक
मडगाव, दि. २१(प्रतिनिधी): दिवाळीच्या पूवसंध्येला मडगावात झालेल्या स्फोटाशी सनातन संस्थेचा काही संबंध आहे काय याबाबत संस्थेच्या रामनाथी येथील आश्रमाची झडती घेण्यासाठी परवानगीला येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने विशेष तपास पथकाला नकार दिला. त्यामुळे या स्फोटाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या या पथकाला झटका बसला आहे.
सदर आश्रम आपल्या कार्यकक्षेत येत नाही व म्हणून आपणास तशी परवानगी देता येणार नाही असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे. सदर पथकाने काल या प्रकरणाच्या तपासाला आरंभ केला. स्फोटासंबंधी आणखी काही धागेदोरे मिळतील काय यासाठी सदर आश्रमाची झडती घेण्याचे ठरवले. त्यासाठी सनातन आश्रमाच्या झडतीची अनुमती मागितली होती. पण, ती नाकारली गेल्याने या पथकाची अडचण झाली आहे.
दरम्यान, मुंबईहून आलेल्या दहशतवादविरोधी पथकाने कोणतेही वॉरंट वगैरे न घेताच काल आश्रमाची झडती घेतली. त्यामुळे त्यांच्या काारवाईबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत.
पोलिस अधीक्षक ओमप्रकाश कुडतरकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने आपले काम सुरू केले असले तरी तपासकामाबाबत कोणतीही माहिती देण्याचे ते टाळत आहेत. तीन वेगवेगळ्या गटांत त्यांचे काम सुरू आहे. तपास करताना सर्व शक्यता ते आजमावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या स्फोट प्रकरणात सनातन संस्थेबाबत पोलिसांच्या हाती अजूनही ठोस पुरावे लागलेले नाहीत.
सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाचे व्यवस्थापक रवींद्र मराठे व "सनातन प्रभात'चे संपादक पृथ्वीराज हजारे यांना आजही येथे पाचारण करून तपास केला जात आहे. आज विशेष तपास पथकाने हजारे यांची चौकशी केली. गेल्या शनिवारपासून रोज दिवसभर त्यांना येथे पाचारण केले जात आहे. आजही त्यांनी आपल्या संस्थेचा या प्रकरणात कोणताच हात नसल्याचे व संस्था केवळ आध्यात्मिकविचारांना वाहून घेतलेली असल्याचा पुनरुच्चार केला. या प्रकरणाचा संस्थेच्या विस्तारावर परिणाम होणार का, या प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.
संस्था केवळ आध्यात्मिक विचारसरणीची आहे. संस्था खरोखरच दोषी आहे काय हा प्रश्र्न प्रत्येकाने आपल्या आत्म्यालाच विचारावे म्हणजे त्याचे अचूक उत्तर मिळेल, असे मराठे यांनी सांगितले.
संपूर्ण मोकळीक विशेष पथकाला हवी
दरम्यान हे प्रकरण सुरुवातीपासून चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे आता या तपासात अनेक अडचणी येत आहेत असे विशेष पथकाचे मत बनले आहे. त्यासाठी आपणाला एक तर संपूणर्र् मोकळीक द्यावी किवा या जबाबदारीतून मोकळे करावे असे या पथकाकडून सरकारला कळवण्यात आल्याचे खास सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार राजकारण्यांकडून विशिष्ट व्यक्तींना अगोदर अटक करा, असे दडपण पोलिस यंत्रणेवर येऊ लागल्यानंतर या पथकाने कामाचा ताबा घेतल्यावर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या गेल्या सोमवारी मडगावात झालेल्या बैठकीत ही बाब स्पष्ट केली. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे सारी सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यामुळेच त्यांनी सदर बैठक आटोपून बाहेर पडताना पत्रकारांशी काहीही बोलण्याचे टाळले व गृहमंत्र्यांनाही बोलू दिले नाही.
पोलिस अधीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी आत्माराम देशपांडे हेच पणजीत यासंदर्भात सांगतील असे जे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केले त्याचा उलगडा आज झाला तो विशेष पथकाच्या भूमिकेची माहिती मिळाल्यानंतर.
उपलब्ध माहितीनुसार सदर बैठकीसाठी मडगावला येण्यापूर्वी गृहमंत्र्यांनी राजधानीत पत्रकारांपुढे जी मुक्ताफळे उधळली त्यांचे संतप्त पडसाद केवळ लोकांतच नव्हे तर सर्वसामान्यातच केवळ नव्हे तर खुद्द पोलिस दलातही उमटले. कोणत्याही ठोस पुराव्याविना कोणालाच अटक केली जाणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली व त्याची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली.
यापूर्वी बाबूश मोन्सेरात तसेच मिकी पाशेको प्रकरणात अशा राजकीय स्वरूपाच्या सूचनांवरून पोलिसांनी जी कारवाई केली होती त्यामुळे पोलिस यंत्रणा न्यायालयात उघडी पडली होती. त्याचे संदर्भ यावेळी देण्यात आले. तसे राजकीय आदेश पाळण्याऐवजी आपणाला बाजूला काढा, अशी तंबीच या पथकाने दिल्याने गृहमंत्री विरुद्ध यंत्रणा असे चित्र सध्या निर्माण झाल्याचे दिसून येते.

No comments: