Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 20 October 2009

राजकीय कुरघोडीसाठी "सनातन'चा बळी नको

गृहमंत्र्यांच्या सूडचक्राचा सनातनकडून निषेध

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - गृहमंत्री रवी नाईक हे आपल्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यावर कुरघोडी करण्यासाठी मडगाव स्फोटाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा स्फोट सनातनच्या विरोधातील एक मोठा बनाव आहे. सनातनच्या साधकाचा खून करण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न यानिमित्ताने यशस्वी झाला. सरकारी तपासयंत्रणा मात्र या प्रकरणाच्या मुळाशी न जाता सनातनला बळीचा बकरा करून गोवण्याचाच अधिक प्रयत्न करीत आहेत. या एकूण प्रकरणी सनातन दोषी नसून उलट या प्रकरणात ही संस्था तक्रारदार आहे. या संस्थेला सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. गृहमंत्र्यांनी याप्रकरणी सूडभावनेने तपास करू नये, असे आवाहन सनातन संस्थेतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
मडगाव येथील दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडलेला प्रकार हा निषेधार्ह आहे. या स्फोटांत मृत्युमुखी ठरलेला मलगोंडा पाटील हा सनातनचा साधक होता हे खरे आहे. त्यासंदर्भात तपासकामी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन संस्थेने दिले आहे.पोलिसांकडून मात्र सनातनचे आश्रम म्हणजे दहशतवादाचे अड्डे असल्याप्रमाणे तपास सुरू आहे.या सर्व प्रकरणांत पोलिस पूर्वग्रहदूषित वृत्तीने कारवाई करीत असल्याचे स्पष्ट जाणवत असून या प्रकरणांत संस्थेला गोवण्याचे नियोजित कारस्थान सुरू असल्याचा ठपकाही संस्थेने ठेवला आहे.
निषाद बखलेंचा "सनात'नशी संबंध नाही
मडगाव स्फोटात स्फोटके ठेवण्यात आलेल्या स्कूटरचे मालक निषाद बखले हे संस्थेचे साधक नाहीत. त्यांचा या संस्थेशी काहीही संबंध नाही. या स्फोटातील अन्य जखमी योगेश नाईक हे केवळ संस्थेच्या आश्रमात दूध पुरवण्यासाठी येतात तेवढाच काय तो त्याचा संस्थेशी संबंध आहे. निषाद बखले हा संस्थेचा साधक आहे. तसेच योगेश नाईक याचाही मृत्यू झाल्याचे प्रसारमाध्यमांव्दारे सांगितले जात असून हा खोटारडेपणाच सुरू असल्याचे संस्थेने पत्रकात म्हटले आहे.
हा तर वडाची साल पिंपळाला लावण्याचाच प्रकार
मडगाव स्फोटाच्या प्रकरणांत पोलिस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नव्हते. त्यात संस्थेच्या चार साधकांची केवळ चौकशी सुरू होती; तरीही प्रसारमाध्यमांव्दारे या घटनेचा मालेगाव प्रकरणाशी संबंध लावला गेला. साधकांना अटक झाल्याचीही वार्ता पसरवण्यात आली. गृहमंत्री रवी नाईक यांनी या घटनेत सनातन संस्थेचा हात असल्याचे अत्यंत घिसाडघाईने केलेले विधान म्हणजे बेजबाबदारीचा कळस आहे, असा आरोपही संस्थेने केला आहे.सनातन संस्थेला नेहमीच पाण्यात पाहणाऱ्यांकडून या घटनेचा संदर्भ देऊन संस्थेविरोधात जो कंठशोष सुरू आहे, त्याला बळी पडून सरकार जर तपासात हयगय करीत असेल तर तो संस्थेवर अन्याय ठरणार असून सरकारने निपक्षःपातीपणे हे प्रकरण हाताळावे.
धाकदपटशाहीविरोधात तक्रार करणार
रामनाथी येथील संस्थेच्या आश्रमात चौकशी करताना १८ ऑक्टोबर रोजी कोणतीही पूर्वकल्पना न देता पोलिसांनी आश्रमातील काही वस्तू ताब्यात घेतल्या.या वस्तूंची नोंदणीही करण्यात आलेली नाही. संस्थेकडून तपासाला पूर्ण सहकार्याचे आश्वासन देऊनही पोलिसांकडून ही धाकदपटशाही सुरू आहे, त्यामुळे नाराजी पसरली आहे.याबाबत योग्य तो कायदेशीर मार्ग स्वीकारून दाद मागितली जाईल,असेही संस्थेने कळवले आहे.
साधकांना कामगार कायदा लावू नका
मडगाव येथील सनातनच्या मुद्रणालयाची पोलिसांनी चौकशी केली व यावेळी येथील कामगार कायद्याप्रमाणे कामगारांची नोंदवही नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.सनातनच्या आश्रमांतील साधक हे पगारी कामगार नाहीत. हे सर्व साधक सेवाभावी वृत्तीने संस्थेत कार्यरत आहेत व त्यामुळेच त्यांना कामगार कायदा लावून कारवाईचा बडगा उगारणे योग्य ठरणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.

No comments: