Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 21 October 2009

स्फोटामागे "सनातन'च असल्याचे म्हटले नाही

पोलिसांची सावध भूमिका

पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- मडगाव येथील स्फोट प्रकरणानंतर राजकीय डाव साधण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे लक्षात येताच, ""या स्फोटामागे सनातन संस्था असल्याचे पोलिसांनी कधीच म्हटलेले नाही'', अशी सावधगिरीची भूमिका आज पोलिसांनी घेतली. पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा विशेष विभागाचे पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा अहवाल पोलिस खात्याकडून अद्याप सरकारला गेलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. या स्फोटात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार सुरू असताना मृत पावलेले मालगोंडा पाटील हा सनातन संस्थेशी निगडीत असल्याने आणि तो या आश्रमात राहत असल्यानेच सनातन संस्थेवर संशय बळावला आणि त्या दिशेने तपास सुरू झाल्याचे श्री. देशपांडे म्हणाले. पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे स्फोटामागे सनातन संस्था असल्याचा गृहमंत्र्यांचा दावा फोल ठरला असून ते या घटनेला वेगळे वळण देण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे.
आजही विशेष तपास पथकाने (एसआयटी) काही साधकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तसेच संस्थेचे विश्वस्त विरेंद्र मराठे व सनातन संस्थेचे संपादक पृथ्वीराज हजारे यांना मडगाव पोलिस स्थानकात बोलावून त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. आजही कोणाला अटक झाली नसल्याची माहिती यावेळी श्री. देशापांडे यांनी दिली. आश्रम आणि सनातन संस्थेच्या छापखान्यावर टाकलेल्या छाप्यात काही कागदपत्रे हाती लागली असून त्यांचा अभ्यास सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच आश्रमात विदेशी व्यक्तींचे वास्तव्य आढळून आले असून अद्याप त्याविषयीची कोणतीही तक्रार नोंद करण्यात आली नसल्याचे ते म्हणाले.
हा स्फोट कसा घडला, कोणी घडवला आणि त्यासाठी कोणी आर्थिक मदत केली याचा संपूर्ण तपास पोलिस करत आहेत. अशा स्फोटाचा तपास लगेच लागत नाही. त्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी उघड होणार असल्याचे श्री. देशपांडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. हा स्फोट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा घातपात घडवून आणण्यासाठी होता असा दावा कॉंग्रेस पक्षातील नेत्याने केल्याचा मुद्दा उपस्थित केला असता, हा जिलेटिन स्फोट लोकांना मारण्यासाठी होता. पण, कोणाला विशेष लक्ष बनवून स्फोट घडवून आणला यावर सध्या भाष्य करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
या स्फोटाला गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणता येणार नाही कारण मालगोंडा पाटील अशा प्रकारचा स्फोट घडवून आणणार, याची माहिती कोणालाही असणे अशक्य होते. कारण अशा प्रकारच्या योजनात कट्टर कार्यकर्ते मोजक्याच व्यक्तींना बरोबर घेऊन ती यशस्वी करतात आणि त्याची कुठे वाच्यता होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात, असे ते म्हणाले. मालगोंडा पाटील याला पोलिसांनी आश्रमात दूरध्वनी करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो वेगळ्या कारणासाठी होता. आश्रमात विदेशी व्यक्ती राहते का? आश्रमासाठी विदेशातून आर्थिक मदत होते का, याविषयीची माहिती मिळवण्यासाठी दि. ११ ऑक्टोबर रोजी मालगोंडा पाटील याला संपर्क साधण्यात आला होता. पण, त्याच्याशी संपर्क साधला नाही, असे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

No comments: