Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 19 October 2009

मडगाव स्फोट तपासासाठी खास पथकाची स्थापना

.. विविध दृष्टिकोनांतून चौकशी
..ठोस पुरावे हाती लागल्याचा दावा
..सनातन छापखान्याची झडती


मडगाव, दि. १८ (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगावात झालेल्या बॉंबस्फोट व सांकवाळ येथे स्फोट घडविण्याच्या दृष्टीने झालेल्या प्रयत्नाप्रकरणी पोलिसांना तपासासाठी पोलिस उपअधीक्षक ओमप्रकाश कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली एक खास पथक नियुक्त करण्यात आले आहे, तशी माहिती पोलिस महानिरीक्षक आर.एस.यादव यांनी आज येथे दिली.
शुक्रवारची मडगावातील घटना ही संपूर्ण पोलिस खात्यासाठी आव्हान स्वरूप ठरल्याने सरकारने ती विशेष गांभीर्याने घेतली आहे व स्वतः पोलिस महानिरीक्षक गेले दोन दिवस मडगावात तळ ठोकून बसलेले असल्याने पोलिस अधिकाऱ्यांची धावपळ चालू आहे.
यादव यांनी आजही येथील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात बसून तपासाबाबत मार्गदर्शन केले, पण तपासात झालेल्या प्रगतीबद्दल काहीही सांगण्याचे त्यांनी टाळले. पोलिस उपअधीक्षक ओमप्रकाश मडकईकर यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
आयइडी स्फोटकाचा वापर
मात्र एका वृत्तानुसार या स्फोटासाठी वापरलेले स्फोटक हे आयइडी स्वरूपाचे होते व अपघातानेच त्याचा स्फोट झाला व त्यामुळेच सनातन कार्यकर्ते त्याचे बळी ठरले.
सदर स्कूटरजवळच एका पिशवीत सापडलेली आणखी दोन स्फोटके आपण निकामी केल्याचा दावाही काल पोलिसांनी केला आहे. मयत पाटील व जखमी योगेश नाईक हे उभयता सदर स्कूटरवर बसले होते व ते ती स्कूटर पार्क करीत असतानाच स्फोटाचा धमाका उडाला,अशी माहिती आता पोलिसांना मिळाली आहे.
सदर स्कूटर योगेशचा भाऊ सुरेश नाईक याची आहे व योगेश ती घेऊन आला होता. योगेश हा वाडी-तळावली(फोंडा) येथील असून त्याचा भाऊ सुरेश हा सरकारी कर्मचारी आहे. पोलिसांनी त्यालाही पाचारण करून चौकशी केली . पण त्याच्याकडून विशेष काहीच माहिती मिळू शकलेली नाही.
सनातन छापखान्याची झडती
पोलिसांनी परवाच्या स्फोटासंदर्भात दैनिक सनातन प्रभातच्या नेसाय येथील छापखान्यावर छापा टाकून झडती शोध घेतला पण तेथे विशेष काहीच सापडले नाही असे सांगण्यात आले. उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने साधारण अर्धा तास या छापखान्याचा कोपरान्कोपरा धुंडाळला पण परवाच्या स्फोटासंदर्भात वा राज्याच्या अन्य कोणत्याही भागात घातपाती कृत्ये करण्याबाबतचा कोणताही पुरावा वा माहिती तेथे मिळाली नाही असे सांगण्यात आले.
दुसरीकडे रामनाथी येथील सनातन मठाचे प्रमुख वीरेंद्र मराठे यांना आजही पोलिसांनी पाचारण करून परवाच्या प्रकाराबाबत तसेच सांकवाळ येथे सापडलेल्या स्फोटकांबाबत विचारणा केली पण त्याच्याकडून विशेष अशी कोणतीच माहिती मिळू शकली नाही,असे सांगण्यात आले.
परवाच्या स्फोटप्रकरणी अजून कोणालाही अटक केलेली नाही पण परवाच्या स्फोटात जखमी झालेला योगेश नाईक हा या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असल्याने गोमेकॉतील त्याच्या वॉर्डाबाहेर पोलिस संरक्षण तैनात केलेले आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यांनी दिली. ते म्हणाले की आता हे प्रकरण खास पोलिस पथकाकडे जाईल व नंतर आपला त्याच्याशी संबंध राहणार नाही. त्याबाबतचा आदेश आज रात्रीपर्यंत येईल. पण या प्रकरणात भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान सनातन प्रभातचे संपादक पृथ्वीराज हजारे व अन्य मंडळींना आज सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी पाचारण करून चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत ती मंडळी येथे होती. मात्र या चौकशीतून काही निष्पन्न झाले की काय कळू शकले नाही.

No comments: