Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 23 October 2009

मळा खूनप्रकरणातील पाचवा संशयित अटकेत

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)- राजधानीत महिला व २ बालकांसह चौघांचा खून करून मृतदेह मळा येथील रुआ द ओरेम खाडीत फेकून देणाऱ्या टोळीतील पाचव्या संशयिताला आज पहाटे बेळगावनजीक टुंकूर या गावातून अटक करण्यात आली. अटक केलेल्याचे नाव मोहन केशवकर (२०) असे असून तोही चिंबल येथे राहणारा आहे, त्याला गोव्यात आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोहन याला आज न्यायालयात हजर करून चौदा दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे. याच खून प्रकरणात अटक केलेला सुरेश केशवकर याचा मोहन हा धाकटा भाऊ आहे.
त्या चौघांचा खून केल्यानंतर मोहन टुंकूर येथील आपल्या भावोजीच्या घरी निघून गेला होता. याच खुनात सहभागी असलेला आणखी एक संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. येत्या काही दिवसांत त्यालाही ताब्यात घेतले जाणार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
यापूर्वी पोलिसांनी बाबू ऊर्फ वड्डा रेड्डी (२८), प्रीतेश ऊर्फ बिच्चू करमलकर (१९) विदेश करमलकर (दोघेही भाऊ) व सुरेश विठ्ठलदास केशवकर (२१) या चौघांना चोवीस तासांत जेरबंद केले होते. यातील एकाने त्या महिलेवर बलात्कार केला होता, अशी माहितीही तपासात उघडकीस आली आहे. सुनिता दिलीप शेट्ये, मुलगा नागेश, मुलगी दीपाली, वयोवृद्ध भालचंद्र साळुंखे या चौघांच्या डोक्यावर अवजड हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे मृतदेह रुआ द ओरेम खाडीत फेकून देण्यात आले होते.

No comments: