Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 23 October 2009

वास्कोतील ठकसेनाकडे कोट्यवधींची मालमत्ता


४१ लाखां ठेवी
बॅंक खाती गोठवली
ट्रेलर, वॅगन आर जप्त


वास्को, दि. २२ (प्रतिनिधी)- भरघोस पगाराची नोकरी आणि पैसे कमवण्याची मोठमोठी आमिषे दाखवून सुमारे ८१४ लोकांना गंडविलेल्या सुरेश आजगावकर या ठकसेनाच्या पत्नीच्या खात्यात तब्बल ४१ लाख ६५ हजार रुपये असल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय तिच्या नावावर असलेला एक ट्रेलर (क्र जीए ०६ टी ०९४९) तसेच एक वॅगन आर गाडी (क्र जीए ०६ डी २११४) पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांची बॅंक खाती गोठवण्यात आल्याची माहिती वास्कोचे पोलिस उपनिरीक्षक रझाक शेख यांनी दिली. आजगावकर दाम्पत्याच्या नावावर असलेले फ्लॅट व त्यांच्या नावे उतरवण्यात आलेला विमा एकत्र केल्यास ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी बेलाबाय वास्को येथे राहणाऱ्या सुरेश आजगावकर ऊर्फ मोरजकर या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याने सुमारे ८१४ अनुसूचित जातीजमातीच्या लोकांना काम देण्याची तसेच इतर प्रकारे पैसे कमावण्याची आमिषे दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडविल्याचे उघडकीस आले होते. वास्को पोलिसांनी सदर संशयिताला १३ ऑक्टोबर रोजी ४२० कलमाखाली अटक करून दुसऱ्या दिवशी प्रथम श्रेणी न्यायालयात उभे करून प्रथम चार दिवसांची व नंतर पाच दिवसांची कोठडी मिळवली होती. उद्या २३ रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
वास्को पोलिसांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली असता त्याच्याजवळ एक कोटीच्या आसपास मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे. वास्को पोलिस उपनिरीक्षक शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार आजगावकर याने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल १८ विमा पॉलिसी केल्या असून विम्याची आगाऊ रक्कमही भरण्यात आली आहे. यांपैकी १६ पॉलिसी प्रत्येकी पन्नास हजाराच्या असून एक दीड लाख तर एक अडीच लाखाची (एकूण १२ लाख) आहे. त्याचप्रमाणे आजगावकर याच्या पत्नीच्या नावावर बॅंकेमध्ये तीन कायम ठेवी खाती असून यात २९ लाख ६५ हजार रुपये गुंतवण्यात आले आहेत. पोलिसांनी विमा व कायम ठेवी खाती गोठवली असून अन्य काही बॅंकेतही आजगावकर यांनी पैसे गुंतवल्याचा अंदाज आहे. "मुरगाव एव्हेन्यू' इमारतीमध्ये आजगावकर याचे तीन फ्लॅट, एक दुकान तसेच चिखली येथील अन्य एका इमारतीमध्ये दोन फ्लॅट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामुळे आजगावकर याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सुरेश आजगावकर हा कस्टममध्ये "गार्ड' म्हणून कामाला असून त्याचा पगार ११,६९९ एवढा आहे. लोकांना कोट्यवधी रुपयांना गंडवल्यानंतर ही रक्कम आपल्या पत्नीच्या नावावर केल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र सरकारच्या एका कनिष्ठ कर्मचाऱ्यापाशी एवढी मोठी रक्कम कशी काय आली, अन्य कोणालाही याचा थांगपत्ता कसा लागला नाही? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रझाक शेख पुढील तपास करीत आहेत.

No comments: