"५२' उमेदवारांचे पालकांसह
आमरण उपोषण सुरू
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)- "मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे सरकार केवळ दैवामुळे तरून आहे पण कामत यांचे हे दैव आमचे दुर्दैव का ठरावे'' असा खडा सवाल अन्यायग्रस्त लोकसेवा आयोगाने निवडलेल्या उमेदवारांची पालकांनी केला आहे. गोवा लोकसेवा आयोगाने गुणवत्ता व पात्रतेच्या आधारावर शिफारस करूनही गेल्या चार महिन्यांपासून नियुक्तिपत्रांची वाट पाहणाऱ्या "५२' पीडित उमेदवारांनी आज आपल्या पालकांसह कॅप्टन ऑफ पोटर्ससमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी या शिक्षकांसह हजर असलेल्या पालकांनी कठोर शब्दांत आपल्या भावना व्यक्त करून सरकारविरोधातील आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली.
""सरकारी नोकरीसाठी गुणवत्तेपेक्षा पैसा व राजकीय वशिलेबाजी हीच पात्रता ठरत असेल तर मग आमच्या मुलांना कष्ट करून शिकवले हीच आमची चूक झाली काय? या समाजात प्रामाणिकता व न्याय ही गोष्ट अजूनही शिल्लक आहे याचा धडा आम्ही मुलांना दिला. सरकारकडून आमच्या मुलांची ज्या पद्धतीने फजिती सुरू आहे ते पाहता आम्ही दिलेली शिकवण फोल ठरण्याचीच भीती निर्माण झाली आहे'' असे मत डिचोली येथील लीला कोटकर यांनी व्यक्त केले. ""मुख्यमंत्री दिगंबर कामत हे स्वतः देवभक्त आहेत त्यामुळे ते आपल्या आचरणात सत्य व न्याय्य भूमिका स्वीकारतील अशी आशा होती; पण या "५२' उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात त्यांच्याकडून ज्या पद्धतीने वक्तव्ये सुरू आहेत त्यावरून या नियुक्तीला खो घालणारी अशी कोणती दानवी शक्ती त्यांच्या मानगुटीवर बसली आहे हे कळायला मार्ग नाही'' अशी प्रतिक्रिया हरमल येथील शशिकांत नाईक यांनी व्यक्त केली. ""लोकसेवा आयोगासारख्या स्वायत्त संस्थेने गुणवत्ता व पात्रतेच्या आधारावर आमच्या मुलांची शिफारस केली पण सरकार दरबारी मात्र या शिफारशीला काडीचीही किंमत नाही. यापुढे पालकांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी कष्ट न घेता अवैध मार्गाने पैसा कमवून एखाद्या राजकीय नेत्याची हुजरेगिरी करावयाला पाठवावे, तेव्हाच त्यांचे भले होऊ शकेल, असा संदेश सरकार देऊ पाहत आहे काय'' असा प्रश्न राघोबा प्रभुदेसाई यांनी उपस्थित केला.
राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांत प्रथम श्रेणी शिक्षक तथा भागशिक्षणाधिकारीपदांसाठी गोवा लोकसेवा आयोगाने एकूण "५२' उमेदवारांची निवड जून २००९ मध्ये केली. या शिक्षकांना नियुक्त करण्याची शिफारस करून चार महिने उलटले तरी अद्याप त्यांना नियुक्तिपत्रे देण्यात येत नाहीत. या "५२' उमेदवारांपैकी बहुतेक उमेदवार हे बहुजन समाजाचे आहेत. "" केवळ मतांवर डोळा ठेवून बहुजन समाजाचे गोडवे गाणारे नेते आता कुठे झोपले आहेत'', अशी टीका शशिकांत नाईक यांनी यावेळी केली. या "५२' शिक्षकांपैकी २६ राखीव व २६ सर्वसाधारण गटातील आहेत. त्यात इतर मागासवर्ग - १५, अनुसूचित जाती - १, जमाती - ८, शारीरिक अपंग - १, स्वातंत्र्यसैनिकांची मुले - १ आदींचा समावेश आहे. सर्व अकराही तालुक्यांना या निवडीत संधी प्राप्त झाली आहे. त्यात पेडणे-५, बार्देश-४, डिचोली-६, सत्तरी-२, काणकोण-४, सासष्टी-७, तिसवाडी-४, फोंडा-६, केपे-६, सांगे-४ व मुरगाव-४ अशी आकडेवारी आहे.
यावेळी भाजपचे आमदार रमेश तवडकर व सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी याठिकाणी भेट देऊन या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवला.
पालकाला अपघात
या आमरण उपोषणाला बसलेल्या एका उमेदवाराचे पालक विठोबा कोटकर हे रस्ता ओलांडत असताना त्यांना एका दुचाकीस्वाराने ठोकरले. यावेळी तात्काळ "१०८' रुग्णवाहिकेला बोलावून त्यांना गोमेकॉत हालविण्यात आले. गोमेकॉत त्यांची तपासणी केली असता ते ठीक असल्याचे सांगितले गेले पण छातीत त्रास जाणवू लागल्याने अखेर त्यांना दाखल करून घेण्यात आले.
Friday, 23 October 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment