Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 30 June 2009

प्रथम श्रेणी शिक्षकांची यादी रद्द करण्याचा प्रयत्न

एका मंत्र्याचा मुख्यमंत्र्यांवर दबाव?
पणजी, दि.३०(प्रतिनिधी)- गोवा लोकसेवा आयोगाकडून सरकारला पाठवण्यात आलेल्या प्रथम श्रेणी शिक्षकांच्या निवड यादीवरून सध्या सरकाराअंतर्गत बरीच धुमश्चक्री सुरू झाली आहे. सरकारातील एका बड्या राजकीय नेत्याकडून शिफारस करण्यात आलेल्या दोन उमेदवारांची निवड झाली नसल्याने ही संपूर्ण यादीच रद्दबातल करण्यासाठी सदर नेत्याकडून थेट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावरच दबाव टाकण्याचे काम सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
गोवा लोकसेवा आयोगाकडून अलीकडेच प्रथम श्रेणी शिक्षक पदांसाठी एकूण ५२ जणांची निवड करण्यात आली आहे. ही निवड यादी यापूर्वीच जाहीर करून त्यांना निवड पत्रेही पाठवण्यात आली आहे. गोवा लोकसेवा आयोगाकडून निवडण्यात येणारे उमेदवार हे निव्वळ आपल्या पात्रतेच्या आधारे निवडले जातात, अशी ख्याती आहे. इथे राजकीय वशिलेबाजीला थारा नसतो किंवा सरकारी निवड प्रक्रियेसारख्या भानगडीही नसतात. त्यामुळे, पूर्णपणे पात्रतेच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या या यादीमुळे काही नेत्यांचे राजकीय हित दुखावले आहे. ही यादीच रद्द करण्यासाठी सदर नेत्याकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ही यादी गेल्या आठवड्यात शिक्षण खात्याला पाठवण्यात आली असली तरी अद्याप ती तिथे पोहोचली नसल्याची भूमिका शिक्षण खात्याने घेतली आहे.
दरम्यान, लोकसेवा आयोगाकडून पाठवण्यात आलेली यादी मंजूर करण्याचा अधिकार हा सरकारला असतो त्यामुळे ही यादी रद्द करण्याचे प्रकार यापूर्वी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. या गोष्टीचा आधार घेऊनच सदर नेत्याने हे प्रयत्न चालवले आहेत. ही यादी रद्द झाल्यास त्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी निवड झालेल्या उमेदवारांनी ठेवल्याने सरकार सध्या कैचीत सापडले आहे.
शिक्षणमंत्री बाबुश मोन्सेरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत परंतु त्यांना या यादीबाबत कोणतीही तक्रार नसल्याची खबर आहे.

No comments: