Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 30 June 2009

जालियनवाला बाग हत्याकांडाचे अखेरचे साक्षीदारही निवर्तले..!

अमृतसर, दि. २९ - भारतीयांवर ब्रिटिशांनी केलेल्या क्रूर अत्याचाराचे प्रतीक म्हणून "गाजलेल्या' जालियनवाला बाग हत्याकांडाचे शेवटचे साक्षीदार सिंगारा सिंग यांचे आज येथे निधन झाले. ते ११३ वर्षांचे होते. सिंग यांनी हा नृसंश मानवसंहार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाच; शिवाय ब्रिटिशांच्या बंदुकीतून सुटलेल्या एका गोळीने त्यांच्या हाताचा वेध घेतला होता. अमृतसर भागात "बापू' या नावाने ते ओळखले जात होते.
बापू सांगत, ते दिवस मंतरलेले होते. व्यापारी म्हणून आलेले ब्रिटिश भारतीयांच्या डोक्यावर राज्यकर्ते म्हणून बसले आणि नंतर तर त्यांनी हिंसाचाराचा कहर केला. आपल्या सत्तेला विरोध करणाऱ्यांना साम-दाम-दंड-भेद यापैकी कोणतेही अस्त्र वापरण्यास त्यांनी कधीच हयगय केली नाही. तो दिवस होता १३ एप्रिल १९१९. ब्रिटिशांना चले जावचा हुकूम देत शेकडो लोक प्रसिद्ध सुवर्ण मंदिराजवळील जालियनवाला बाग परिसरात एकवटले होते. त्यांच्याकडे कोणतीही शस्त्रे नव्हती. ब्रिटिशांच्या विरोधात ते जोरजोराने नारेबाजी करत होते. त्याचवेळी ब्रिगेडिअर रेजिनाल्ड डायर याचे डोके त्या घोषणांनी भणभणले व या उलट्या काळजाच्या अधिकाऱ्याने या निशस्त्र निदर्शकांवर गोळीबाराचा आदेश दिला. त्यापूर्वी त्याने कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. हे ब्रिटिश सैनिक एवढे पिसाट झाले होते की, जेव्हा त्यांच्याकडील दारुगोळा संपला तेव्हाच त्यांनी गोळीबार थांबवला. तोपर्यंत शेकडो लोक अक्षरशः तडफडून मरण पावले. जालियनवाला बागेत तेव्हा मृतदेहांचा खच साचला होता. "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाच्या रक्ताने कोण न्हाले,' असे ते करुण दृश्य पाहून कोणाच्याही काळजाला पाझर फुटला असता. यातील आणखी संतापजनक भाग म्हणजे क्रूरकर्मा डायर याला मशिनगन व उखळी तोफांच्या साह्याने निदर्शकांवर हल्ला करायचा होता. मात्र तिथपर्यंत जाण्यास तेवढा प्रशस्त मार्ग नव्हता. अन्यथा मृतांची संख्या किती झाली असती याची कल्पनाच केलेली बरी. गोळीबारापूर्वी डायर याने चारही छोटी प्रवेशद्वारांना टाळे ठोकले व मुख्य प्रवेशद्वारावर सैनिकांना सज्ज ठेवून गोळीबाराचा आदेश दिला. त्यावेळी अनेकांनी जीवाच्या आकांताने त्या बागेत असलेल्या विहीरीत उड्या घेतल्या आणि आपली जीवनयात्रा संपवली. अधिकृत आकडेवारीनुसार या हत्याकांडात ३७९ जण हुतात्मा झाले तर सुमारे ११०० जण जखमी झाले. मात्र घटना प्रत्यक्ष पाहिलेल्यांच्या मते दोन हजारांची आहुती या स्वातंत्र्यसंग्रामात पडली.
मार्च २००३ मध्ये जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी जेव्हा जालियनवाला बागेला भेट दिली तेव्हा त्यांनी बापूजींचा खास गौरव केला होता. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी आज सिंगारा सिंग उर्फ "बापू' यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. शिवाय जालियनवाला बाग हत्याकांडात हुतात्मा झालेल्यांचेही त्यांनी स्मरण केले.

No comments: