पणजी, दि.४ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी "म्हादई'चा प्रश्न हा निवडणुकीचा मुद्दाच नसेल, असे वक्तव्य केल्याने म्हादई बचाव अभियानातर्फे त्याची तीव्र दखल घेण्यात आली आहे. म्हादईचा विषय हा केंद्र सरकारकडे सोडवावा लागणार आहे व हे काम निवडून येणाऱ्या खासदारांनाच करावे लागेल. यामुळे डॉ. विली यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया "म्हादई बचाव'चे निमंत्रक प्रा. राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे.
म्हादईसंदर्भात डॉ. विली यांनी केलेल्या वक्तव्यांचे तीव्र पडसाद उमटले असून डॉ. विली यांनी मुख्यमंत्री असताना म्हादईबाबत विशेष प्रयत्न केले नाहीत, असा ठपकाही यावेळी ठेवण्यात आला. म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे, त्यामुळे ही नदी वाचवण्याचा हा निवडणुकीसाठीचा विषय नसल्याचा डॉ. विली यांचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी मारक ठरण्याचीच जास्त शक्यता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
गंगा नदी जशी भारतीयांसाठी महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे म्हादई ही नदी गोव्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी नदी आहे. कोणताही राजकीय पक्ष हा विषय टाळूच शकत नाही, असे मत माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले आहे. डॉ. विली हे डॉ. विलीच आहेत, अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. गोव्यातून दिल्लीत जाणाऱ्या खासदारांनी यासंदर्भात गोव्याचे हित सांभाळावेच लागेल, असेही ऍड. खलप यांनी म्हटले आहे.
Sunday, 5 April 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment