फ्रेंडस् ऑफ बीजेपी आयोजित टोंक-पणजी येथील कार्यक्रमात बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद(छायाः सुनील नाईक)
सर्वांना समान न्याय हाच भाजपचा प्रमुख मुद्दा - रविशंकर प्रसाद
पणजी, दि .७ (विशेष प्रतिनिधी) - "कुणाचेही लाड न करता सर्वांना समान न्याय देणार' हा भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा आहे. सध्याच्या परिस्थितीत देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. दहशतवादाचा बीमोड, राष्ट्रीय पातळीवरील जलद विकास, रोजगार व वाढत्या महागाईचे संकट आदींना खंबीरपणे तोंड देणारे नेतृत्व सध्या देशाला हवे आहे. तांत्रिक, आर्थिक, संरक्षण व अध्यात्मिकता या सर्वच बाबतीत आपला देश येत्या काळात अग्रेसर असेल परंतु हे लक्ष्य गाठण्यासाठी लालकृष्ण अडवाणी व अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांचे पाठबळ असलेला भाजपच हाच सध्या देशासमोर योग्य पर्याय असल्याचे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केले.
"फ्रेंड्स ऑफ बीजेपी' या अभिनव मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी "आयआयटी' क्षेत्रातील मान्यवर अमीत मालविया व राजेश जैन हजर होते. या संघटनेच्या गोव्याच्या निमंत्रक सहाना नायकही यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर तथा व्यावसायिक समुदायातील जाणकार उपस्थित होते. देशाला एक ताकदवार नेत्याची गरज आहे जो दहशतवादाचा बिमोड करू शकतो.राष्ट्रीय पातळीवर विकासाला चालना,रोजगार व वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्याची कुवत असलेला नेता या देशाला मिळवून देण्यासाठी "फ्रेंड्स ऑफ बिजेपी' या संघटनेच्या सदस्यांनी या लोकसभा निवडणुकीत सक्रियपणे भाग घेण्याची गरज आहे,असेही आवाहन त्यांनी केले. दरम्यान,केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे.देशाच्या सुरक्षेकडे केवळ मतांसाठी तडजोड केली जात असल्याचे कॉंग्रेस सरकारने स्पष्टपणे आपल्या कृतीतून दाखवले आहे,अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. देशातील बहुसंख्य मतदार हे ३५ वर्षे वयोगटातील असून त्यांची टक्केवारी सुमारे ६४ टक्के आहे, त्यामुळे पुढील पाच वर्षांचे भवितव्य ठरवणे त्यांच्या हातात आहे.
या देशाला चांगले दिवस यायचे असतील तर देशाच्या भवितव्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या या गटातील मतदारांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडून प्रत्यक्ष मतदानप्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल व पुढील काळात राजकारणात सक्रिय व्हावे लागेल,असेही श्री.प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजप हा जातीय पक्ष असल्याचा कॉंग्रेसचा नेहमीचा आरोप फेटाळून लावताना प्रसाद यांनी सांगितले की, अल्पसंख्याकांना भाजपपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस भाजपला नेहमीच हे दूषण देत आली आहे. अशा पद्धतीने कॉंग्रेस व संपुआने अल्पसंख्याक समाजाला विकासापासून वंचित केले आहे. गुजरातमध्ये मोदी यांनी १७ टक्के विकास दर गाठला आहे, त्याचा लाभ काय मुस्लिमांना होत नाही? तो विकास काय केवळ तेथील हिंदूंसाठीच आहे? सरदार सरोवराचे पाणी अथवा "थ्री फेझ'द्वारा खेड्यापाड्यात केला जाणारा वीज पुरवठा हा केवळ हिंदूंसाठीच आहे?असे प्रश्न श्री. प्रसाद यांनी विचारले. मुस्लिमांचे सर्वाधिक दरडोई उत्पन्न गुजरातमध्ये आहे, तर मुस्लिमांचे सर्वांत कमी दरडोई उत्पन्न ३५ वर्षे डाव्यांची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आहे. भाजप ख्रिश्चन व मुस्लिमांना भारतीय नागरिक मानते केवळ मतपेढी नव्हे! असे ते म्हणाले.
कॉंग्रेसने आतापर्यंत अल्पसंख्याकांना नेहमीच मतपेढी म्हणून पाहिले. भाजप मात्र त्यांना भारतीय नागरिक मानतो आणि तेही दुसऱ्या दर्जाचे नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. नागालॅंड, मिझोराम, मेघालय आदी ख्रिस्ती मोठ्या संख्येने असलेल्या राज्यांमध्येही भाजपला चांगले स्थान आहे. देवेगौडा आणि गुजराल यांचे दिवस संपले आहेत. मनमोहनसिंग हे अपघाताने पंतप्रधानपदी बसले आहेत, तिसरी आघाडी हा केवळ पार्किंग जागा आहे. सध्या देशाला अडवाणी यांच्यासारख्या खंबीर नेत्याची आणि रालोआसारख्या आघाडीची गरज आहे, असे ते म्हणाले.
कॉंग्रेसने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे आणि आता तर ते काही दूरचित्रवाणी वाहिन्यांना आणि वृत्तपत्रांना आमिषे दाखवून एकतर्फी बातम्या प्रसारित करीत आहेत, असे यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. ज्यावेळी मध्यमवर्गीयाने देशाचे नेतृत्व केले, त्यावेळीच देश संपन्नतेकडे गेला आहे, जर्मनी, जपान अथवा अमेरिका ही याची उदाहरणे आहेत. मध्यमवर्गानेच देशाचा स्वातंत्र्यसंग्राम अथवा गोव्याचा मुक्तिलढा पुढे नेला. आता याच वर्गाला पुढे येऊन भाजपसारख्या पक्षाला संधी देऊन वेगाने विकास करायची संधी द्यायला हवी, असे ते म्हणाले.
फ्रेंडस् ऑफ बीजेपी ही संघटना कशा प्रकारे स्थापन झाली, त्याबद्दल परदेशी व्यवसाय करणारे उद्योजक राजेश जैन व बॅंकर अमीत मालवीय यांनी आपले अनुभव कथन केले. संपुआच्या गैरकारभाराला जनतेने थारा देऊ नये, यासाठी चांगले नेते निवडून चांगले सरकार सत्तेवर आणा असे आवाहन त्यांनी सांगितले. हा देश आपला आहे, मुले ही आपले भवितव्य आहे, त्यामुळे सर्वात चांगल्या अशा भाजपला निवडून आणुया असे ते म्हणाले.
हा कार्यक्रम प्रश्नोत्तराने संपला, त्याचे सूत्रसंचालन डॉ.सहाना नायक यांनी केले.
Wednesday, 8 April 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment