Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 9 April 2009

उत्तरेत ७ तर दक्षिणेत ११ उमेदवार रिंगणात

पणजी व मडगाव, दि. ८ (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. उत्तर गोव्यात एकूण सात उमेदवार तर दक्षिणेत ११ उमेदवार रिंगणात उरले आहेत. दरम्यान, उत्तरेत भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मगो तर तर दक्षिणेत कॉंग्रेस, भाजप व युगोडेपा अशा तिरंगी लढती होण्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, आज उत्तर व दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी के.एस.सिंग व मिहीर वर्धन यांनी आपापल्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करून ही माहिती दिली. उत्तरेत रिंगणात असलेल्या शेवटच्या यादीत ख्रिस्तोफर फोन्सेका(भाकप),जितेंद्र देशप्रभू(राष्ट्रवादी कॉंग्रेस),पांडुरंग राऊत(मगो),श्रीपाद नाईक(भाजप), उपेंद्र गांवकर(शिवसेना),नरसिंह सूर्या साळगांवकर(अपक्ष) व मार्था डिसोझा(अपक्ष) यांचा समावेश आहे. तर दक्षिणेत फ्रान्सिस सार्दिन (कॉंग्रेस ), ऍड. नरेंद्र सावईकर(भाजपा), ऍड. राजू मंगेशकर(भा.क.प), रोहिदास हरिश्र्चंद्र बोरकर (सेव्ह गोवा फ्रंट), माथानी साल्ढाणा (युगोडेपा), जवाहर डायस (अपक्ष) डॅरीक डायस (अपक्ष) , फ्रांन्सिस आंतोन फर्नांडिस(अपक्ष), हमजा खान (अपक्ष), साळुंखे स्मिता प्रवीण (अपक्ष), मुल्ला करीम (अपक्ष) यांचा समावेश आहे.
आता व्हल्नरेबल व क्रिटीकल मतदान केंद्रे!
संवेदनशील मतदान केंद्रांची व्याख्या बदलून आता निवडणूक आयोगाने त्याची विभागणी दोन पद्धतीत केली आहे. व्हल्नरेबल व क्रिटीकल अशा पद्धतीत या मतदानकेंद्रांना संबोधले जाईल. सध्या उत्तर गोव्यात ३९ व्हल्नरेबल तर दक्षिण गोव्यात १३ व्हल्नरेबल व ७३ क्रिटीकल मतदान केंद्रांची नोंद करण्यात आली आहे. मतदान शांततापूर्ण व निर्भय वातावरणात संपन्न होण्यासाठी दोन्ही मतदारसंघात मिळून एकूण १२ निमलष्करी दलाच्या तुकड्यांची मागणी केंद्राकडे केली आहे. या मागणीबाबत अद्याप मान्यता मिळाली नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दक्षिणेत व्हल्नरेबल मतदान केंद्रांत मडगावातील मोती डोंगर ,नावेलीतील रुमडामळ,जुवारीनगर येथील तीन, फोंडा येथील दोन मतदान केंद्रांचा समावेश आहे. आजवरच्या मतदानात तेथे झालेले गैरप्रकार, मतदारांना दिलेल्या धमक्या, मतदानापासून परावृत्त करण्याचा झालेला प्रयत्न व मुक्त मतदानात आलेला अडथळा यांचा आढावा घेऊन ही निवड करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
मागील निवडणुकीत एकाच मतदान केंद्रावर ७५ टक्क्यांवर मतदान एकाच उमेदवाराला झालेली केंद्रे क्रिटीकल विभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था पालनासाठी खास उपाय योजना आखताना १२०० राज्य पोलिसांची मदतही घेतली जाणार असेही यावेळी सांगण्यात आले.
राज्यात एकूण १०,१९,९७९ मतदार
दरम्यान,राज्यात दोन्ही मतदारसंघात एकूण १०,१९,९७९ मतदारांची नोंद आहे. त्यात उत्तरेत ४,८६,७८९ तर दक्षिणेत ५,३३,१९० मतदारांचा समावेश आहे. उत्तरेत एकूण ६७९ मतदान केंद्रे तर दक्षिणेत एकूण ६६० मतदान केंद्रे असतील. उत्तरेतील मतदारांत २,४४,२०८ (पुरुष) तर २,४२,५८१(महिला) मतदारांचा समावेश आहे तर दक्षिणेत २,६७,७६९ (पुरुष) व २,६५४२१ (महिला) मतदार आहेत.
यावेळी निवडणूक मोहिमेवर प्रथमच विभाग अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते राजपत्रित अधिकारी आहेत. त्यांच्याकडे प्रत्येकी १० ते १२ मतदान केंद्रे असतील व ते तेथे फिरून तेथील सुविधांची पहाणी करतील व त्या बाबतचा अहवाल निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करतील . मतदानास आठ दिवस असताना हेच लोक तेथे दंडाधिकारी म्हणून काम पाहतील. या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचे प्रशिक्षण दोन फेऱ्यांतून दिले गेले आहे.

No comments: