काले, दि.५ (प्रतिनिधी) - कुळे दुधसागर धबधब्याकडे सहलीसाठी आलेल्या मडगाव हायस्कूलमधील इयत्ता दहावीत शिकणारा शेल्टन परेरा (१६) या बोर्डा मडगाव येथे राहणाऱ्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा साथीदार फ्रान्सिस परेरा याला गंभीर अवस्थेत कुडचडे काकोड्याच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
आज (दि.५) सकाळी मडगाव हायस्कूलमधून सुमारे १२ जणांचा गट रेल्वेने दुधसागर नदीवर सहलीसाठी आला होता. यावेळी शेल्टन व फ्रान्सिस हे दोघे धबधब्याच्या पायथ्याशी आंघोळीसाठी गेले व पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात हे दोघेही बुडाले. उपस्थितांनी त्यांना लगेच पाण्याबाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेने काकोडा इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरनी शेल्टनला मृत घोषित केले. फ्रान्सिस हा बेशुद्धावस्थेत असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शेल्टनचा मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविण्यात आला आहे. कुळ्याचे उपनिरीक्षक तुळशीदास नाईक अधिक तपास करीत आहेत.
अनमोड मोले रस्त्यावर
महिलेचा मृतदेह, खुनाची शक्यता
कुडचडे, दि.५ (प्रतिनिधी) - अनमोड मोले येथील मुख्य रस्त्यावर आज संध्याकाळी झुडपात एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला असून सदर महिलेचा कपड्याच्या साहाय्याने गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मोले अनमोड मुख्य रस्त्याच्या झुडपात आढळलेल्या या मृतदेहाच्या बाजूस एक लहान मुलाचा कपड्याचा पाळणा आढळला असून सदर पाळण्याच्या कपड्याने सदर महिलेचा गळा दाबला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
या दरम्यान सुकतळी मोले येथील बसस्थानकावर कृष्णा बारकेलो व बरकर यांनी सकाळी साडेअकराच्या दरम्यान ६ महिन्याचे अर्भक असल्याची माहिती कुळे पोलिसांना दिली. यावेळी सदर मुलाला अपनाघरमध्ये पाठवण्यात आले असून सदर मूल त्या मयत महिलेचे असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. जिल्हा उपनिरीक्षक सेराफीन डायस व निरीक्षक मनोज म्हार्दोळकर याबाबत अधिक तपास करत आहेत.
Monday, 6 April 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment