पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादी की कॉंग्रेस लढवणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असला तरी जितेंद्र देशप्रभू यांच्या उमेदवारीवरून दोन्ही पक्षांमध्ये नाराजी असून कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसत आहे. देशप्रभू यांनी पेडणे तालुक्यातील देवदर्शनाने प्रचारास प्रारंभ केला आहे खरा पण त्यांच्यासाठी कोणत्या पक्षाचे नेते व कार्यकर्ते काम करणार आहेत, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी आपल्या खासदारकीच्या कालावधीत केलेली कामे आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क व त्यांच्यामागे उभी असलेली भाजप कार्यकर्त्यांची खंबीर फळी यामुळे त्यांना टक्कर देणे हे काम सोपे नसल्याने अनेक इच्छुक नेत्यांनी आपले घोडे पुढे दामटले नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
देशप्रभू घराणे हे मूळ कॉंग्रेसचे. स्वतः जितेंद्र देशप्रभू हे निष्ठावान कॉंग्रेस नेते मानले जातात. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षत्याग करून राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारावी लागली. या "पक्षांतरा'बद्दल ते स्वतः किती समाधानी आहेत याबद्दल शंकाच आहे, शिवाय त्यांचे कार्यकर्ते आता राष्ट्रवादीचा किती आस्थेने प्रचार करतील, याबद्दल संशय आहे. उत्तर गोवा मतदारसंघाचा विचार करता, कॉंग्रेसचे अवघे दोनतीन आमदार तरी त्यांच्या प्रचारात उतरतील का हा प्रश्न आहेच. दयानंद नार्वेकर यांनी उमेदवारीच्या घोळाबद्दल डिचोली येथे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. म्हापसा, कळंगुट, शिवोली, डिचोली, मये, पणजी आदी मतदारसंघांत भाजपचे आमदार श्रीपाद नाईक यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले आहेतच परंतु पक्षाचे लहान मोठे नेते आणि कार्यकर्ते उत्साहाने श्रीपाद नाईक यांच्या प्रचारात दंग झाले आहेत. असे चित्र देशप्रभू यांच्याबाबतीत दिसत नाही. धारगळचे आमदार बाबू आजगावकर व देशप्रभू यांच्यातील "संबंध' सर्वज्ञात आहेत. सत्तरी तालुक्यातील खाशे थोडाफार हातभार लावू शकत असले तरी दुसऱ्या पक्षासाठी मते मागताना, त्यांना स्वतःच्या भविष्याचाही विचार करावा लागणार आहे. यावेळी "घड्याळा'ला मत देण्याचे आवाहन करायचे आणि पुढील निवडणुकीत "हाता'ला मते मागायची, ही स्थिती त्यांच्यासाठी अडचणीची ठरणार आहे.
उत्तर गोवा मतदारसंघात आपल्या पक्षाचा नेता उभा असला तरी तो राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभा आहे, त्यामुळे आपण पक्ष म्हणून मतदारांशी संपर्क साधू शकणार नाही, याची जाणीव अनेक कॉंग्रेस नेत्यांना झाली आहे. याउलट देशप्रभू हे "लादलेले' उमेदवार असल्याची भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहे. स्वपक्षासाठी जागा मिळविली पण उमेदवार दिला तो कॉंग्रेसचा, अशी चर्चा या पक्षात सुरू असून त्याबाबत प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याचसाठी अट्टहास केला होता का, असे हे कार्यकर्ते नेत्यांना विचारीत आहेत. आता देशप्रभू यांना मत देण्यासाठी आवाहन व प्रचार करण्याची वेळ या पक्षांमधील इच्छुक उमेदवारांवर आली असल्याने त्यांची चांगलीच गोची झालेली आहे, त्यामुळेच निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याचाच त्यातील अनेकांचा प्रयत्न दिसतो आहे. निवडणूक प्रचारावेळी दोन्ही पक्षांचे नेते काही ठिकाणी एकत्रित दिसतीलही पण ते केवळ श्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करण्यासाठी. तळागाळातील कार्यकर्ते मात्र एकमेकांना मदत करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, असेच चित्र अनेक ठिकाणी आहे.
Monday, 6 April 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment