स्विस बॅंकांतील भारतीयांचा पैसा
परत आणू ; भाजपचे आश्वासन
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - स्विस बॅंकांत भारतीयांनी गुंतवलेला पैसा स्वदेशी आणण्याच्या भाजपने केलेल्या मागणीबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी स्वीकारलेले मौन ही देशासाठी लज्जास्पद गोष्ट असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी केंद्रीयमंत्री तथा राज्यसभा खासदार रविशंकर प्रसाद यांनी केली. लोेकसभा निवडणुकीत जनतेने भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेवर आणले तर हे प्रकरण गंभीरपणे हाताळून कायदेशीर तसेच कार्यवाहीच्या पातळीवर ते सोडवले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
"फ्रेंडस ऑफ बीजेपी' या अनोख्या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी गोव्यात दाखल झालेल्या रविशंकर प्रसाद यांनी आज येथे पत्रकारांची भेट घेतली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी आमदार राजेंद्र आर्लेकर उपस्थित होते. विदेशांत पैसा गुंतवणाऱ्यांत भारतीय आघाडीवर आहेत. सुमारे २५ ते ७० लाख कोटी रुपये एवढी अवाढव्य रक्कम देशोदेशीच्या बॅंकांत जमा आहे. हा पैसा भारतात आणून भारतीय बॅंकांत गुंतवल्यास देश उभारणीच्या कार्यात तो उपयोगी पडू शकेल, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले. हा पैसा भारतात आणण्याचे प्रयत्न सरकारने करावेत, अशी आग्रही मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना पत्र पाठवून केली होती. लंडन येथे नुकत्याच झालेल्या "जी-२०' देशांच्या शिखर परिषदेत हा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित करावा, असेही अडवाणी यांनी म्हटले होते; परंतु या गोष्टीकडे कॉंग्रेस अजिबात लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळे "दाल मे कुछ काला तो नही' असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
सध्या जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नॉर्वे, स्वीडन आदी देशांनी हा पैसा परत आपल्या देशात नेण्याची तयारी केली आहे. या देशांनी स्विस बॅंकांकडे आपापल्या देशातील गुंतवणूकदारांची यादी मागवली आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतीयांप्रमाणेच चीन, रशिया आदी देशांच्या नागरिकांनी स्वतःकडील पैसा विदेशी बॅंकांत जमा केलेला आहे. याआधी हे देश या मुद्यावर फार चिंतित नव्हते. तथापि, आता तेही चिंतित झाले आहेत. त्यांनाही वाटते की आपल्याच नागरिकांचा एवढा प्रचंड पैसा मायदेशी यावा. तो विदेशात गुंतून राहावा ही बाब देशाच्या दृष्टीने योग्य नाही. रालोआ सत्तेवर आल्यास आम्ही हा मुद्दा गंभीरपणे हाताळू, असेही यावेळी श्री. प्रसाद यांनी स्पष्ट केले.
"उलटी पुलटी आघाडी'
लोकसभा निवडणुका जवळ येत असता कॉंग्रेसची परिस्थिती एखाद्या बुडत्या जहाजाप्रमाणे झाल्याचा ठपका ठेवत केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे घटक पक्ष कॉंग्रेसपासून फारकत घेत आहेत, त्यामुळे ही "उलटी पुलटी आघाडी' बनल्याचा टोला प्रसाद यांनी लगावला. केवळ ममता बॅनर्जी, शरद पवार, व द्रमुक हेच काही प्रमाणात कॉंग्रेसबरोबर आहेत. त्यात शरद पवार तर थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत,असा चिमटाही त्यांनी काढला. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी दिवसेंदिवस इतिहासजमा होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून देशातील विविध भागांतून "रालोआ' बाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. सद्यस्थितीत देशाला "रालोआ' हाच योग्य पर्याय असल्याचे लोकांना पटत चालले आहे,असा विश्वासही प्रसाद यांनी व्यक्त केला.
लालू यांचा निषेध
कॉंग्रेसचे युवा नेते वरुण गांधी यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या कृतीचा धिक्कार करीत केवळ अल्पसंख्याकांच्या मतांवर डोळा ठेवून हे राजकारण केल्याचा आरोप प्रसाद यांनी केला. मुंबई हल्लाप्रकरणी अटक केलेल्या कसाबला हा कायदा लागू झाला नाही; परंतु वरुण गांधींना "रासुका' लावला. यावरून मायावती यांनी कसे सुडाचे राजकारण चालवले आहे याची जाणीव होण्यास हरकत नाही, असेही ते म्हणाले.वरुणबाबत लालूप्रसाद यादव यांनी केलेले वक्तव्य त्यांना शोभणारे नाही असे सांगत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध प्रसाद यांनी केला.
तथाकथित तिसरी व चोैथी आघाडी पाहता देशात केवळ सत्तेसाठी राजकीय साठमारी सुरू असल्याची टीका त्यांनी केली. मुळात देशाला स्थिर सरकार,विकास व सुशासन हवे आहे. त्यासाठी "रालोआ' हाच सर्वोत्तम पर्याय आहे, हे जनता उघडपणे मान्य करीत असल्याने यापुढे सत्तेची सूत्रे भाजपप्रणीत "रालोआ'कडेच येतील,असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हा प्रकार दुर्दैवी, पण...
गृहमंत्री चिदंबरम यांच्यावर दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दैनिक जागरणच्या एका शीख पत्रकाराने बूट भिरकावून मारल्याचा प्रकार दुर्दैवी आहे. तथापि, या कृतीमुळे जनतेच्या मनात सरकाराबाबत खदखदणारा असंतोष प्रकट झाला,असे मत प्रसाद यांनी व्यक्त केले. १९८४ साली देशात हजारो शिखांचे शिरकाण झाले व त्यात सुमारे १० हजार शीख लोक मृत्युमुखी पडले. त्याची धग अजूनही या लोकांच्या मनात कायम आहे. या दंगलीत सामील असल्याचा ठपका असलेल्या कॉंग्रेस नेत्यांना "सीबीआय'ने माफ केल्याने त्याचा निषेध म्हणूनच हा प्रकार झाल्याचे एकूण परिस्थितीवरून दिसून येते, असेही त्यांनी सांगितले. दहशतवादाचा सुनियोजितपणे सामना करण्यासही कॉंग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करून देशात बॉम्बस्फोटांची मालिका सुरूच असल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
Wednesday, 8 April 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment