आठ ठार; ६० जखमी
गुवाहाटी, दि. ६ - आसामातील मालिगाव, ढेकाईजुली, धुब्री आणि मातिकाछर या चार ठिकाणी आज संशयित उल्फा बंडखोरांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांत किमान आठ जण ठार तर ६० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग उद्या मंगळवारी आसामच्या निवडणूक दौऱ्यावर येत असताना हे बॉम्बस्फोट झाले आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आसामचे पोलिस महासंचालक जे. एम. श्रीवास्तव यांनी सांगितले की, गुवाहाटी शहरातील मालिगाव भागात आज दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या बॉम्बस्फोटात सात जण ठार तर ५६ जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे या भागात उभ्या असलेल्या २० मोटारसायकली व इतर वाहनांना आगी लागल्या. इतकेच नाही तर जवळच असलेल्या एका तीन मजली इमारतीलाही आग लागली. याच इमारतीत पोलिसठाणेही आहे.
या स्फोटांमागे उल्फा बंडखोरांचा हात असून त्यांनी स्फोटासाठी अतिशय उच्च दर्जाची स्फोटके व तंत्रज्ञान वापरले असल्याचे दिसून येत आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालिगाव चारीअलीजवळ असलेल्या पार्किंगच्या भागात आज दुपारी दोनच्या सुमारास एका कारमध्ये जोरदार स्फोट झाला व एकच गोंधळ उडाला. लोक सैरावैरा धावू लागले. रस्यावर किंचाळण्याचे ओरडण्याचे व कण्हण्याचे आवाज येत होते. स्फोटात जखमी झालेल्यांना संजीवनी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
स्फोटानंतर बऱ्याच उशिराने रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्याने लोक संतप्त झाले होेते. स्फोटानंतर या भागाकडे लोक मोठ्या संख्येने आपापली वाहने घेऊन धावल्याने या भागात रहदारीची मोठी बिकट समस्या उभी झाली. त्यामुळे घटनास्थळाला सुरक्षा जवानांनी लगेच घेरा घातला. घेरा यासाठीही टाकला की या भागात पेरून ठेवण्यात आलेल्या आणखी काही स्फोटकांचा स्फोट होऊन अधिक जीव हानी होऊ नये.
सोनितपूरमध्येही बॉम्बस्फोट
मालिगाव स्फोटापाठोपाठ आसाममध्ये आणखी एक बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. सोनितपूरच्या धेकियाजुली बाजारात हा बॉम्बस्फोट झाला आहे. हा बॉम्ब एका सायकलवर ठेवण्यात आला होता. या स्फोटात चार ते पाच लोक जखमी झाले आहेत. यातील काहींची स्थिती चिंताजनक आहे. या स्फोटांकडे बघता राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षा व कायदा-सुव्यवस्था स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन स्फोटांचा तपास सुरू असतानाच धुब्री आणि मातिकाछर या दोन ठिकाणी उल्फा बंडखोरांनी स्फोट घडवून आणले. यात एक जण ठार तर सहा जण जखमी झाले. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्यला हे स्फोट झाल्याने सुरक्षा यंत्रणांची एकच तारांबळ उडाली असून, स्फोट घडविणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
इटलीमध्ये भयंकर
भूकंपात १०० ठार
लाखो बेघर, आणीबाणी घोषित; दीड हजारावर जखमी
लाकिला(इटली), दि. ६ ः मध्य इटलीला आज पहाटे जबरदस्त भूकंपाचा धक्का बसून त्यात प्राथमिक माहितीनुसार किमान शंभरावर लोक मृत्युमुखी पडले आहेत तर दीड हजार लोक जखमी झाले आहेत. भूकंपाने जमीनदोस्त झालेल्या हजारो घरांच्या व इमारतींच्या ढिगाऱ्याखाली हजारो लोक अडकून पडलेले असल्याने मृतांचा व जखमींचा आकडा वाढू शकतो, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या भूकंपामुळे हजारो लोक बेघर झाले असून देशात आणिबाणी लावण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान सिलव्हिओ बरलुस्कोनी यांनी केली आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू रोमपासून ११० किमी अंतरावर म्हणजे लाकिला शहराजवळ होता. स्थानिक वेळेनुसार आज पहाटे ३ वाजून ३२ मिनिटांनी भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. यावेळी लोक साखरझोपेत होते. एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासूनच या भागाला आतापर्यंत भूकंपाचे नऊ धक्के बसलेले आहेत. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची तीव्रता ६.३ रिक्टरस्केल एवढी नोंदविण्यात आली आहे. भूकंपानंतर काही तासात इटलीचे अंतर्गत मंत्री रॉबर्टो मोेरोनी लाकिला भागात आले. हजारो घरे जमीनदोस्त झालेली असल्याने त्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर प्रारंभ झाले असून भूकंपबळींचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
लाकिलाचे महापौर मासिमो सिएलेंटे यांनी सांगितले की शहर व परिसरातील कमीतकमी एक लाख लोक बेघर झाले असून अनेक ऐतिहासिक इमारती क्षतिग्रस्त झाल्या आहेत.
भूकंपाने जमीनदोस्त झालेली घरे, इमारतीच्या मलब्याखाली अडकून पडलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्यासाठी व जखमींना दवाखान्यात पाठविण्यासाठी रस्त्यावर पोलिस, स्थानिक अधिकारी, कर्मचारी, रुग्णवाहिका, डॉक्टर्स, मदतपथके, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते कामाला लागलेले होते. या शहरातील काही प्रमुख सरकारी तसेच खाजगी रुग्णालयेही जमीनदोस्त झाली आहेत वा कोसळण्याच्या स्थितीत आहेत. अशा स्थितीत येथील रुग्णांना इतर शहरांत पाठविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. पोलिसांनी मृतांचा आकडा १०० सांगितला असला तरी प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार तो वाढू शकतो.
Tuesday, 7 April 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment