
म्हापसा येथे भाजपतर्फे आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलताना केंद्रीय सचिव स्मृती इराणी. सोबत श्रीपाद नाईक व मान्यवर. (छाया : किशोर कोलगे)
म्हापसा प्रचारसभेत स्मृती इराणींची टीका
म्हापसा, दि. १० (प्रतिनिधी) गोव्याची सभ्यता व सौंदर्य देश पातळीवर मलिन करण्याचे काम कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले आहे. तेव्हा अशा पक्षांना व नेत्यांना त्यांची जागा दाखविण्याचे पवित्रकार्य २३ तारखेला मतदान करून दाखवा असे आवाहन भाजपच्या केंद्रीय सचिव स्मृती इराणी यांनी आज (दि.१०) सकाळी म्हापसा येथे रेसिडेन्सी सभागृहात आयोजित केलेल्या प्रचार सभेत केले. त्यांनी आपल्या घणाघाती भाषणात कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या कारभारावर व नेत्यांवर अकार्यक्षमतेचा आरोप करताना त्यांचा खरपूस समाचार घेतला. देशातील दहशतवादाला कॉंग्रेस पक्ष संपूर्णतः जबाबदार असून आज देशात आर्थिक, मानसिक व सामाजिक दहशतवाद पसरविण्याचे काम कॉंग्रेस व राष्ट्रवादीने केले आहे. याबाबत सांगताना मुंबईच्या दहशतवादात निष्पापांचे बळी व जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयाची परिस्थिती कथन करताना लोकांच्या अंगावर शहारे आले. मुंबईवर दहशतवादी हल्ला होत असताना गृहमंत्री शिवराज पाटील व महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील बेताल व चीड आणणारी वक्तव्ये करीत होते. अशा लोकांना जनतेनेच जागा दाखविली, परंतु निवडणुकीत पराभूत झालेल्यांची मंत्रिपदी वर्णी लागली हा निर्लज्जपणा फक्त कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षच करू शकतात. रोजगार हमी योजना भाजपचे सरकार असलेल्या राज्यात यशस्वी झाली परंतु कॉंग्रेस सरकार असलेल्या राज्यात ती विफल ठरली. कॉंग्रेसचे उमेदवार जेव्हा खासदार श्रीपाद नाईकांनी गोव्यात किती लोकांना नोकऱ्या दिल्या असा प्रश्र्न उपस्थित करतात, तेव्हा त्यांनी निदान एवढा तरी विचार करायला हवा की स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम अथवा तशी परिस्थिती निर्माण करणे हे राज्य शासनाचे काम असते. राज्यात शासन कॉंग्रेसचे असल्याने ते काम तुमचेच असते असा प्रतिटोला मारल्यावर सभागृहात हशा पिकला.
उमेदवार श्रीपाद नाईक यांनी आपल्या भाषणात मतदार व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना केवळ वर्तमानपत्रातून बातमी वाचून आजच्या बैठकीला इतके लोक आले. यावरून २३ तारखेला सर्व लोक मतदान केंद्रावर नक्कीच गर्दी करतील अशी आशा व्यक्त केली. आपण केलेल्या आजपावेतो कामाची जंत्रीच त्यांनी लोकांसमोर सादर केली. गोव्यातून पहिलाच खासदार जो सर्वाधिक मतांनी निवडून आला पण पहिल्याच वेळी केंद्रात मंत्रिपद ही मिळाले व त्यानंतर विविध खाती आपल्याला मिळत गेली व त्याचा आपण पुरेपूर फायदा करून घेतला. आत्तापर्यंत ४०० प्रकल्प मार्गी लावले असून त्यापैकी ३६० प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यासाठी रु. २४ कोटी निधी विकासकामाला केंद्राकडून गोव्याला मिळविला. सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाच्या योजना आपण राबविल्या परंतु विरोधी पक्षाच्या उमेदवाराला हा विकास नको आहे. ८१६ सभागृह स्मशानभूमी अशी सार्वजनिक हिताची विकासकामे आपण केली. पेडणे तालुक्यात खेळाची मैदाने बांधण्यास पेडण्याचे जमीनदार थोडीही जमीन देत नाहीत ते काय समाजसेवा करणार असे ही त्यांनी सांगितले. आजच्या या सभेला आदर्श सुनेला ऐकण्यासाठी महिलावर्गाची खूप गर्दी होती. व्यासपीठावर स्मृती इराणी समवेत खासदार श्रीपाद नाईक, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार सदानंद तानावडे, महिला मोर्चा अध्यक्ष मुक्ता नाईक, युवा मोर्चा अध्यक्ष आशिष शिरोडकर, उपनगराध्यक्ष ऑस्कर डिसोझा, नगरसेविका वैशाली फळारी, मंडळ अध्यक्ष रूपेश कामत, नगरसेवक रोहन कवळेकर, वैधवी नाईक, ऍड. रंजिता तिवरेकर, गोव्याच्या प्रभारी शिल्पा पटवर्धन, सचिव अविनाश कोळी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार मांद्रेकर यांनी आपल्या खोचक व विनोदी शैलीत कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादाचे वाभाडे काढले. उत्तर गोवा महिला प्रमुख शुभांगी वायंगणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुक्ता नाईक यांनी स्मृती इराणी व श्रीपाद नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राजासिंग राणे यांनी सूत्रसंचालन केले तर रूपेश कामत यांनी आभार प्रदर्शन केले. स्मृती इराणी यांनी प्रथम मराठीत भाषणास सुरुवात केली, तेव्हा लोकांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. सभेनंतर महिला वर्गांनी त्यांना गराडा घातला व स्वाक्षरी घेतली.
No comments:
Post a Comment