Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 5 April 2009

चर्चिल यांची कोलांटी श्रेष्ठींचा निर्णय शिरसावंद्य

पणजी, दि.४ (प्रतिनिधी): दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसची उमेदवारी आपली कन्या वालंकाला मिळवून देण्यासाठी कालपर्यंत दिल्लीत तळ ठोकून बसलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आज अचानक कोलांटी मारली. विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना उमेदवारी देण्याचा श्रेष्ठींचा निर्णय शिरसावंद्य आहे व आपण श्रेष्ठींच्या आदेशानुसार या निवडणुकीत पक्षासाठी काम करणार आहोत, अशी भूमिका घेत त्यांनी श्रेष्ठींसमोर सपशेल लोटांगण घातले.
सार्दिन यांच्या उमेदवारीवर दावा करून चर्चिल यांनी सुरू केलेल्या राजकारणाला आज अचानक कलाटणी मिळाली. सार्दिन यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेला असतानाही दिल्लीत आपली कन्या वालंका हिला उमेदवारी मिळावी यासाठी "लॉबिंग' करत असलेल्या चर्चिल यांना अखेर श्रेष्ठींनी चांगलेच खडसावल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. निवडणूक आयोगाने "सेव्ह गोवा फ्रंट' पक्षाचे कॉंग्रेस पक्षातील विलीनीकरणही अवैध असल्याचा निवाडा दिल्याने चर्चिल अधिकच गोत्यात आले आहेत. आता चर्चिल व त्यांचे सहकारी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांचे भवितव्यच सभापती प्रतापसिंग राणे यांच्या हाती गेल्यामुळे त्यांची हवाच गेल्याचीही चर्चा कॉंग्रेसमध्ये सुरू आहे.
चर्चिल यांनी आज जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात आपली कन्या वालंका हिला उमेदवारी न मिळण्याचा ठपका अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री दिगंबर कामत व प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्यावर ठेवला आहे. दक्षिण गोव्यातील लोकांचा वालंकाला मिळत असलेला प्रतिसाद पाहिल्यानंतर श्रेष्ठींनी सार्दिन यांच्या उमेदवारी घोषणेला स्थगिती दिली होती. तथापि, मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी सार्दिन यांची बाजू उचलून धरल्याने श्रेष्ठींनी अखेर त्यांनाच उमेदवारी देण्याचे ठरवले, असा खुलासा चर्चिल यांनी केला. पाळी पोटनिवडणुकीत गुरूदास गावस यांचे बंधू प्रताप गावस यांना विजयी करून मुख्यमंत्री कामत व शिरोडकर यांनी आपली ताकद सिद्ध केली. या निवडणुकीतून गोव्याची जनता त्यांच्या पाठीमागे असल्याचे त्यांनी श्रेष्ठींना दाखवून दिले आहे. दक्षिण गोवा लोकसभेची जागा कॉंग्रेस निसटत्या फरकाने तरी राखू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कामत व शिरोडकर हे दोन्ही नेते राजकारणात अनुभवी आहेत व आपल्यापेक्षा लोकप्रिय आहेत, त्यामुळे श्रेष्ठींनी त्यांचा शब्द मानून सार्दिन यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले, असा टोलाही यावेळी चर्चिल यांनी हाणला.
दक्षिण गोव्यातील जनतेचे आभार
दरम्यान, दक्षिण गोव्यातून राष्ट्रीय जनता दल व बहुजन समाज पक्षातर्फे वालंकाला निवडणुकीत उतरवण्याचे प्रस्ताव आपल्यासमोर आले. येथील लोकांनी तिला अपक्ष म्हणूनही रिंगणात उतरवण्याची मागणी केली. परंतु, श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे हेच आपण आपले कर्तव्य समजतो, असे सांगून चर्चिल यांनी श्रेष्ठींचा आदर राखला आहे. लोहिया मैदानावर झालेल्या बैठकीला दक्षिण गोव्यातील विविध सरपंच, पंच सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक आदींचे आभार चर्चिल यांनी मानले आहेत. त्यांनी वेळोवेळी आलेमाव कुटुंबीयांना सहकार्य दिल्याने संपूर्ण कुटुंब त्यांच्यासाठी नेहमीच कार्यरत राहील, असेही चर्चिल यांनी म्हटले आहे.

No comments: