पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उत्तर गोवा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेले पेडण्याचे जमीनदार तथा माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांची मालमत्ता सुमारे ६० कोटीपेक्षा जास्त असल्याचे मालमत्ता प्रतिज्ञापत्रावरून सिद्ध झाल्याने ते सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी सादर केलेल्या मालमत्ता प्रतिज्ञापत्रात गोवा राज्य सहकारी बॅंक व म्हापसा अर्बन सहकारी बॅंकेतील कथित थकबाकीचा टाळलेला उल्लेख, त्यासंदर्भात दाखल झालेला फौजदारी गुन्हा तसेच आयकर भरणाबाबत दिलेली माहिती यावरून अनेक शंका उपस्थित झाल्याने विरोधकांच्या हाती आयतीच संधी चालून आल्याची जोरदार चर्चा आज राजकीय गोटात सुरू होती.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवाराने आपली वैयक्तिक मालमत्ता जाहीर करण्याची गरज असते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या देशप्रभू यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला परंतु मालमत्ता प्रतिज्ञापत्र मात्र शनिवारी सुपूर्द केले.त्यांनी सादर केलेल्या मालमत्ता प्रतिज्ञापत्रात ते सुमारे ६० कोटीपेक्षा जास्त मालमत्तेचे मालक ठरले आहेत. दरम्यान,या मालमत्तेबाबत माहिती देताना विविध ठिकाणी काढलेल्या कर्जांची माहिती देणेही बंधनकारक आहे. देशप्रभू यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केवळ आयसीआयसीआय बॅंकेतील कर्जापैकी १५ लाख रूपये बाकी असल्याचे म्हटले आहे परंतु गोवा राज्य सहकारी बॅंक व म्हापसा अर्बन बॅंकेत असलेली जुनी थकबाकी मात्र त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दाखवली नसल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी म्हापसा अर्बन बॅंकेकडून त्यांच्यावर २००३ साली फौजदारी खटला दाखल केला होता त्याचाही उल्लेख त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केला नसल्याचे उघड झाले आहे. म्हापसा अर्बन बॅंकेत त्यांची सुमारे ९५ लाख रुपये जुनी थकबाकी असल्याची माहिती बॅंकेतील सूत्रांनी दिली. गोवा राज्य सहकारी बॅंकेलाही ते सुमारे ५६ लाख रुपये देणेकरी आहेत व या थकबाकी वसुलीसाठी बॅंकेने त्यांच्यावर केंद्रीय सहकार निबंधक लवादासमोर खटला दाखल केला आहे, याचीही नोंद त्यांनी या प्रतिज्ञापत्रात देण्याचे टाळले आहे.
दरम्यान, त्यांच्यावर गुन्हा विभागात म्हापसा अर्बन बॅंकेने दाखल केलेल्या खटल्याबाबत या विभागाचे अधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांच्याशी काही पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी ही चौकशी सध्या जैसे थे असल्याचे सांगून बॅंक व त्यांच्यात समझोता झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी बॅंकेच्या अधिकृत सूत्रांकडे संपर्क साधला असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला. देशप्रभू यांनी या खटल्याविरोधात बॅंकेवर नागरी खटला दाखल केला आहे व बॅंकेने त्यांच्यावरील फौजदारी गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. देशप्रभू जोपर्यंत थकबाकी भरत नाहीत तोपर्यंत हे गुन्हे मागे घेणे शक्य नाही ,अशी माहितीही बॅंकेकडून देण्यात आली. देशप्रभू यांनी आपल्या या थकबाकीबाबत प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला नसल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही सहकारी बॅंकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
आयकर भरणा शून्य
सुमारे ६० कोटी रुपयांचे मालक असलेल्या देशप्रभू यांच्याकडून एकही पैसा आयकर भरणा केला जात नाही ही गोष्टही अनेकांना तोंडात बोटे घालण्यास लावणारी ठरली आहे. देशप्रभू यांची आपला सर्व महसूल हा कृषी व्यवसायातून येत असल्याचे सांगून त्यासाठी आयकर भरणा करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी आयकर विभागात केलेली प्रक्रिया १९८६-८७ साली केल्याची धक्कादायक नोंदही या प्रतिज्ञापत्रांत केली आहे. कृषी संपत्ती असल्याने संपत्ती कराची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. दरम्यान,देशप्रभू यांनी आपल्या या प्रतिज्ञापत्रात हातात १० लाख रुपये रोख असल्याचे सांगितले आहे. मात्र एकही बॅंक, बिगर बॅंक संस्था, वित्तीय संस्था आदी ठिकाणी ठेवी नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, देशप्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची पेडणे तालुक्यात ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची जमीन असल्याचे म्हटले आहे. मुंबई,पणजी,पेडणे आदी ठिकाणी सुमारे २ कोटी रुपये किमतीचे फ्लॅट व फार्म हाउस आहेत. सुमारे ५ कोटी ४० लाख रुपये विविध वित्तीय संस्थेत गुंतवले असून त्यांची सध्याची किंमत २ कोटी ३८ लाख रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. १ कोटी ५ लाखांच्या वडिलोपार्जित भेट वस्तू असल्याची माहिती देताना एकूण पाच अलिशान वाहनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. बाकी म्हापसा,पणजी, व मुंबई येथे असलेल्या घरांची किंमतही त्यांनी यावेळी दिली आहे.
Tuesday, 7 April 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Wa was wa, 60 crores income and no income tax to govt.?
Haa tar sarkaari jaawai buwaa......
Post a Comment