Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 10 April 2009

टायटलर, सज्जनकुमार निवडणूक रिंगणाबाहेर

कॉंग्रेस प्रचंड दबावाखाली, शिखांची निदर्शने सुरूच
नवी दिल्ली, दि. ९ : १९८४ च्या शीख दंगल प्रकरणी सीबीआयने "क्लीन चीट' दिल्यामुळे वादग्रस्त ठरलेले कॉंग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांच्याविरोधातील खटल्याची सुनावणी आज येथील कडकडडुमा न्यायालयाने येत्या २८ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत टायटलर यांनी उभे न राहण्याचे जाहीर केल्यानंतर लगेचच कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी टायटलर यांच्यासह सज्जनकुमार यांनाही निवडणूक रिंगणाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी राकेश पंडित यांनी हा निवाडा दिला. "सीबीआय'ने दंगलप्रकरणी खुनाचा खटला दाखल असलेल्या टायटलर यांना "क्लीन चीट' दिली होती. तसेच त्यांच्याविरुद्धचा खटला बंद करण्याचीही भूमिका घेतली होती. त्या भूमिकेवर आजही सीबीआयने ठामपणा दर्शविला. टायटलर यांच्याविरुद्ध खटला चालविण्यासाठी पुरेसे साक्षी-पुरावे किंवा आधार नसल्याचे सीबीआयचे म्हणणे होते. आज नवी दिल्लीतील कडकडडुमा कोर्टातही त्यांनी हीच भूमिका मांडली. तसेच टायटलर यांच्यावर मनुष्यवधाचा आरोप असल्याने हा खटला सत्र न्यायालयातच चालवला जाऊ शकतो, असा तांत्रिक मुद्दाही उपस्थित केला.
त्यानंतर न्या. राकेश पंडित यांनी या खटल्याची सुनावणी २८ पर्यंत स्थगित केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर तांत्रिक बाजू तपासून निर्णय दिला जाईल, असेही ते म्हणाले.
सीबीआयने ८४ च्या दंगल प्रकरणी टायटलर यांना "क्लीन चीट' दिल्यानंतर शीख समुदायाकडून या निर्णयाला प्रचंड विरोध सुरू झाला. त्यातच एका शीख पत्रकाराने या प्रकाराचा निषेध म्हणून चिदम्बरम यांच्यावर भर पत्रकारपरिषदेत जोडा भिरकावल्यानंतर हे प्रकरण आणखीनच उफाळले. त्या पत्रकाराने क्षमायाचना केली तरी शीख समुदाय मात्र या प्रकरणी टायटलर यांच्यावर जाम भडकला आहे. अशा स्थितीत टायटलर यांची लोकसभा निवडणुकीची उमेदवारीही धोक्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज एका पत्रपरिषदेत बोलताना टायटलर म्हणाले की, माझे मन मला सांगत आहे की माझ्यामुळे पक्षाला बराच ताणतणाव सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा स्थितीत पक्षाला अडचणीत आणून मला निवडणुकीला सामोरे जाण्याची इच्छा नाही. मी माझ्या वतीने पक्षापुढे उमेदवारीबाबत माघार घेण्याचा पर्याय ठेवला आहे. याचा निर्णय मी पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी आणि पक्षाच्या कार्यकारिणीवर सोडला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य राहील, असेही टायटलर म्हणाले होते. त्यांच्या विचाराचे स्वागत करीत कॉंग्रेसने त्यांना निवडणुकीबाहेर राहण्याची परवानगी दिली.
सलग तीन वेळा दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आलेले ६५ वर्षीय टायटलर यावेळी ईशान्य दिल्लीतून कॉंग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्यासोबतच शीख दंगल प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात असणारे सज्जनकुमार दक्षिण दिल्लीतून उमेदवार होते. या दोघांनाही यावेळी निवडणुकीचे तिकीट न देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला. शीख समुदायाचा विरोध लक्षात घेऊन कॉंग्रेसला जनमताच्या दबावामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असे राजकीय समीक्षकांचे मत आहे.
शिखांची निदर्शने
दरम्यान, १९८४ च्या दंगलप्रकरणी सीबीआयकडून कॉंग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांना "क्लीन चिट' दिल्याप्रकरणी शीख बांधवांमधील असंतोष वाढीस लागला असून, आजही ठिकठिकाणी याविरोधात शिखांनी निदर्शने केली.
टायटलर यांच्याविषयीची सुनावणी ज्या न्यायालयात सुरू होती, त्या परिसरातही शेकडो निदर्शनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. टायटलर यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ नये, ८४ च्या दंगलीतील आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी, अशा मागणीही शीख संघटनांनी केली आहे. यात ऑल इंडिया शीख स्टुडण्ट्स फेडरेशन, शिरोमणी अकाली दल (बादल), खालसा रेजिमेंट आदींचा समावेश होता. शिखांची निदर्शने लक्षात घेऊन न्यायालय आणि आसपासच्या परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys