Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 30 March 2009

वरुणविरुद्ध "रासुका'

पिलीभित, दि. २९ - उत्तर प्रदेश सरकारने रात्री उशिरा वरुण गांधी यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्या(रासुका) खाली कारवाईचा निर्णय घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असून, ही कारवाई राजकीय सुडबुद्धीने केली गेल्याची तीव्र प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली आहे. त्यापूर्वी मनेका गांधी यांनीही हा प्रकार सुडबुद्धीचा असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी नोंदविलेल्या नव्या तक्रारीत वरुण गांधी यांच्याविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न आणि दंगल माजविल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. शनिवारी पिलीभित येथे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही हिंसा माजल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आणखी एका तक्रारीत वरुण गांधी यांच्यासह उत्तर प्रदेशाचे भाजप प्रदेशाध्यक्ष कलराज मिश्रा, स्थानिक आमदार सुखलाल, माजी आमदार बी.के.गुप्ता यांच्याविरुद्ध संचारबंदीचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. शनिवारी या भागात १४४ कलम लागू करण्यात आले होते, त्यावेळी मोठा जमाव जमल्याने शांतताभंग झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
वरुण यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत त्यांच्याविरुद्ध १४७,१४८ व १४९ कलमांखाली दंगल माजविणे, ३०७ खाली हत्येचा प्रयत्न, ३३२ खाली सार्वजनिक सेवा बजावताना अधिकाऱ्याला इजा पोचविणे तसेच ३३६ कलमाखाली इतरांच्या सुरक्षेला धोका पोचविणे असे आरोप भां.द.संहितेखाली नोंदविण्यात आले आहेत. त्याशिवाय तुरुंग परिसरात हिंसक कारवायाचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पिलीभित तुरुंग परिसरात काल वरूणसमर्थक व पोलिस यांच्यात जोरदार हिंसक चकमक झाली होती, त्यासंदर्भात तुरुंगाधिकारी मुकेश अरोरा यांनी वरुण गांधी यांच्याविरुद्ध ही तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, मुस्लिम अधिकाऱ्याने काही समर्थकांना इजा केल्याचा वरुणच्या आईचा (मनेका) आरोप जिल्हा दंडाधिकारी अशोक चव्हाण यांनी फेटाळला आहे. त्याठिकाणी तो अधिकारी नव्हता असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. तो वादग्रस्त अधिकारी त्या ठिकाणी नसेल याची आम्ही खबरदारी घेतली होती असे त्यांनी सांगितले. संचारबंदीचा भंग केल्याचा आरोप ठेवून अनेकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती लखनौमध्ये पोलिस प्रमुखांनी पत्रकारांना दिली.
नवी दिल्ली येथे बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना, वरूणला उमेदवारी न देण्याबद्दल भाजपला सल्ला देण्याच्या कृतीला आक्षेप घेतला. वरुण गांधी यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप अद्याप सिद्ध न झाल्याचे अडवाणी यांनी सांगितले. ध्वनिफितीत फेरफार करण्यात आला असून तो आपला आवाज नसल्याचे वरुण गांधी यांनी सांगितल्याचे अडवाणी यांनी निदर्शनास आणून दिले. त्या कथित प्रक्षोभक भाषणाशी पक्षाचा संबंध नसल्याचे यापूर्वीच भाजपने स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले. एखाद्याला उमेदवारी न देण्याचा आयोगाने सल्ला देण्याची गेल्या ६० वर्षांतील ही पहिलीच घटना असल्याचे ते म्हणाले. घटनेनुसार पक्षाने योग्य भूमिका घेतल्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले. पक्षाच्या उमेदवारांनी संयम राखण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.
वरुण गांधींच्या कृतीला भाजपचा पाठिंबा आहे का, याचे स्पष्ट निवेदन करण्याचे अडवाणी यांनी टाळल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे. निवडणूक आयोगावरील टीका अनाठायी असल्याचे कॉंग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

No comments: