Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 16 May 2008

५० थकबाकीदारांना महापालिकेच्या नोटिसा, २२ मे पासून टाळे ठोकणार

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेतर्फे आता थकबाकीदारांविरोधात जोरदार मोहीम उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आत्तापर्यंत घरपट्टी व महापालिका भाडे न भरलेल्या व सुमारे ५० हजार रुपयांहून जास्त देणे असलेल्या पन्नासहून जास्त थकबाकीदारांना अंतिम नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती महापौर टोनी रॉड्रिगीस यांनी दिली. येत्या २२ मेपासून अशा आस्थापनांना टाळे ठोकण्याची जय्यत तयारीही महापालिकेने चालवली आहे.
पणजी महापालिकेला घरपट्टी, भाडे व इतर करांच्या रूपात सुमारे ४ कोटी रुपये येणे आहेत. काही लोकांची थकबाकी ५० हजार रुपयांहून जास्त असल्याने ती वसूल करण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत. आत्तापर्यंत सुमारे ५० हून जास्त लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून येत्या दिवसांत हा आकडा आणखीन वाढणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव गडकर यांनी दिली. ही नोटीस स्वीकारल्यानंतर १५ दिवसांच्या आत थकबाकी जमा करायची आहे. ही मुदत संपल्यानंतर कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. थकबाकीदारांत जादा तर व्यापारी वर्गांचा समावेश असून त्यांनी ताबडतोब आपल्या थकबाकीचा भरणा करावा असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.
संगणक विभागाचा कामचुकारपणा
ताळगावचा भाग वेगळा करून त्याचे रूपांतर २००२ साली पंचायतीत केले असले तरी येथील घरांची नोंदणी अद्याप पणजी महापालिकेकडे तशीच पडून असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पणजी महापालिका क्षेत्रात सुमारे दहा हजार घरांची नोंद असली तरी त्यातील सुमारे चार हजार घरे ही ताळगाव पंचायत क्षेत्रातील आहेत. महापालिकेच्या थकबाकीचा मोठा हिस्सा हा ताळगावातील सदर घरांचा असल्याने या घरांची नोंद महापालिका नोंदणी अहवालातून वगळण्यासाठी संगणक विभागाला सक्त ताकीद देण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त श्री.गडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील माहितीला पुष्टी दिली. हा गोंधळ सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी मान्य केले. ताळगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या घरांचे सर्वेक्षण करून ही घरे पालिका नोंदणीतून वगळण्यासाठीचे काम सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या गोष्टीला आता पाच वर्षे उलटूनही ते पूर्ण केले जात नसल्याचे कारण विचारले असता त्यांनी आपण स्वतः लक्ष घालून ते पूर्ण करून घेणार असल्याचे सांगितले.

No comments: