पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) : मान्सूनने निर्धारित वेळेच्या पाच दिवस आधीच दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागराला धडक दिल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात त्याचे गोव्यात आगमन होण्याची शक्यता पणजी वेधशाळेचे प्रमुख के. व्ही. सिंग व्यक्त केली आहे.
दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागराला वेळेपूर्वीच मान्सून धडकल्याने आठवडाभरातच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची आशा यामुळे बळावली आहे. बंगालच्या उपसागरात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही तर केरळात मान्सून पोहोचण्यासाठी सुमारे दहा ते बारा दिवस लागतात. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा वाढू लागला आहे. केरळमध्ये मान्सून पोहोचल्यावर आठवडाभरात तो गोव्यात दाखल होतो. यंदा तो वेळेपूर्वीच गोव्यात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही श्री. सिंग यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासूनच अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून वादळी वारेही वाहात आहेत. या भागात मान्सून वेळेपूर्वीच सक्रिय होण्यासाठी ही स्थिती पोषक असल्याने अपेक्षेनुसार आज तेथे मान्सूनचे ढग सक्रिय झाले.
आगामी दोन दिवसांतच अंदमान आणि बंगालचा उर्वरित भाग मान्सूनमुळे व्यापला जाईल. त्यानंतर एक-दोन दिवसांतच या संपूर्ण भागात धो-धो पाऊस होण्याची शक्यता आहे. अंदमानमध्ये वेळेपूर्वी मान्सून दाखल झाला असल्याने केरळातही तो २० मेपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी केरळात २६ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. एरवी केरळमध्ये मान्सूनचे आगमन १ जूनच्या आसपास होते. महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी ही खूषखबरच म्हटली पाहिजे.
Wednesday, 14 May 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment