Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 17 May 2008

सभागृह समितीला डावलल्याने सरकारची बेफिकिरी उघड

कचराप्रश्नी दामोदर नाईक यांची टीका
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): राज्यातील कचऱ्याच्या गंभीर विषयावर सरकार अजूनही बेफिकीर असून ही समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली आहे. गेल्या अधिवेशनात कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी सभागृह समिती नेमण्यात आली असताना समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता सरकार हा विषय अजूनही प्रामाणिकपणे हाताळत नसल्याचा आरोप भाजप विधिमंडळ प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यांनी केला.
आज पणजी येथे भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हजर होते. कचऱ्याची विल्हेवाट व त्यासाठी जागेची निवड हे विषय हाताळण्यासाठी गेल्या विधानसभा अधिवेशनात सभागृह समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून घेण्यात येणारा निर्णय सरकारला मान्य होणार असल्याच्या अटीवर ही समिती नेमण्यात आल्याचे श्री.नाईक म्हणाले. या समितीची पहिली बैठक ४ एप्रिल २००८ रोजी झाली. यावेळी विरोधी भाजप सदस्यांनी या विषयावरून सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. या बैठकीनंतर १५ दिवसांनी पुन्हा एकदा बैठक घेऊन कचरा प्रकल्पासाठीची जागा निश्चित करण्याबाबत चर्चा करण्याचे ठरले. आता महिना उलटला तरी ही बैठक बोलावण्यात आली नाही. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अलीकडेच गुजरात येथील राजकोटस्थीत एका कंपनीकडून राज्य सरकारला प्रस्ताव सादर झाल्याचे वक्तव्य करून लवकरच पर्यावरणमंत्री इतर आमदार व काही पंचायत सदस्य या ठिकाणाची भेट घेणार असल्याचेही विधान केले होते. हा विषय दोन महिन्यांत सोडवण्यासाठी सभागृह समितीची नेमणूक करून सरकार समितीला विश्वासात न घेता हा विषय अशा पद्धतीने हाताळत असेल तर समितीची गरजच काय होती. कचरा समस्येवरून सरकार चुकीच्या पद्धतीने वावरत असून ही परिस्थिती अशीच राहिल्यास ही समस्या भविष्यात जटिल बनणार असल्याचा धोका श्री. नाईक यांनी बोलून दाखवला.
सोनसोडोः"सीबीआय' चौकशी करा
सोनसोडो येथील नियोजित "हायक्वीप' कंपनीला प्रकल्प उभारण्याचे काम दिल्याप्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाला असून याही प्रकरणाची "सीबीआय' चौकशी करा, अशी मागणी आमदार दामोदर नाईक यांनी केली. या कंपनीला निविदा देण्यापासून ते काम सुरू होण्यापूर्वीच १० टक्के रक्कम देण्यापर्यंत सर्वच गोष्टी संशयास्पद असून आत्तापर्यंत हे काम सुरू झाले नसल्याने हा एक महाघोटाळाच असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. सरकारातील मंत्री फक्त विदेश दौरे करण्यात मग्न असून जनतेच्या समस्या व अडचणींकडे लक्ष देण्यास त्यांना मुळीच सवड नाही,असा टोलाही दामोदर नाईक यांनी शेवटी हाणला.

No comments: