Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 14 May 2008

जयपूर अजूनही दहशतीच्या छायेत चौकशीसाठी आठ जण ताब्यात

भीती आणि सन्नाटा...
महिलेचा हात असल्याची चर्चा
अमेरिकेची मदतीसाठी तयारी
बिहारमध्ये अतिदक्षतेचा आदेश

जयपूर, दि. १४ : मंगळवारी बॉम्बस्फोट मालिकेने हादरलेले जयपूर शहर अजूनही दहशतीच्या छायेखाली असून, स्फोटांच्या चौकशीसाठी आठ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या स्फोटांतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये व जखमीच्या नातेवाईकांना एक लाख रुपये राजस्थान सरकारतर्फे देण्यात येणार आहेत. मंगळवारी सायंकाळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर संपूर्ण जयपूर शहरासह देशभरात खळबळ उडाली. सलग ९ स्फोटांनी नागरिक हादरून गेले. राजस्थान सरकारने राज्यात राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. स्फोटांमुळे हादरलेल्या जयपूरच्या नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. जयपूरमधील १५ पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रात दक्षतेचा उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी सकाळी ९ पासून सायंकाळी ६ पर्यंत लागू राहणार आहे. लाल कोठी, आदर्श नगर, ट्रान्सपोर्ट नगर, मानक चौक, सुभाष चौक यासह १५ ठिकाणी ही संचारबंदी लावण्यात आली आहे. बॉम्बस्फोट आणि अन्य कारणांनी दगावलेल्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त यातून सूट दिली गेली आहे.
आठ जणांची चौकशी
दरम्यान, कालच्या बॉम्बस्फोट प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलिस अधिकारीअमरज्योत सिंह गिल यांनी सांगितले की, ज्या आठ जणांना आम्ही ताब्यात घेतले आहे त्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. यात महिलेचा समावेश असल्याची चर्चा आहे. मात्र नेमकी कोणाला अटक करण्यात आली आणि यात कोणावर संशय आहे, या सर्व बाबी चौकशीच्या टप्प्यात आहेत. त्याविषयी कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
स्फोटामागे पाकचा हात
जयपूरमधील स्फोटांमागे थेट पाकचाच हात असल्याची शक्यता गुप्तहेर संघटनांच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
याबाबत माहिती देताना पोलिस महासंचालक कुलदीप खोडा यांनी सांगितले की, काश्मिरातील नव्याने सुरू झालेली घुसखोरी आता पाक पुन्हा अतिरेकी हल्ले वाढवित असल्याचेच द्योतक आहे. दोन दिवसांपूर्वी सीमेवरील सांबा क्षेत्रात अतिरेक्यांनी हैदोस घातला. तेथे अतिरेक्यांनी निरपराध नागरिक आणि सुरक्षा जवानांना ठार केले. आता त्यांनी जयपूरमध्ये स्फोट घडवून आणले आहेत. या सर्व प्रकारांतून पाकचे मनसुबे फारच घातक दिसत आहेत.
मंगळवारी झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या १०० च्या वर गेली आहे. शिवाय, शेकडो लोक जखमी अवस्थेत सध्या जयपूरमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी आज सर्व रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आणि मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. पण, एकंदर जखमींची स्थिती पाहता मृतांचा आकडा वाढू शकतो असे त्यांनी सांगितले आहे.
जयपूरमधील बॉम्बस्फोट मालिकेच्या पार्श्वभूमीवर आज बिहार सरकारने राज्यात "रेड अलर्ट' जारी केला आहे.
अमेरिकेची मदतीची तयारी
या संदर्भात तपासाच्या मदतीसाठी अमेरिकेने हात पुढे केला आहे. तसेच बॉंबस्फोटांच्या मालिकेचा ब्रिटन, फ्रान्स, इस्रायल, कॅनडा आदी अनेक देशांनी निषेध केला आहे.
--------------------------------------------------------------------
स्फोटांसाठी सायकलींचा वापर
या स्फोटांसाठी अमोनियम नायट्रेट आणि एकाच ब्रॅंडच्या रेसर सायकलींचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातील न्यायालयाच्या परिसरात व हैदराबादमध्ये मशिदीत स्फोट घडवून आणण्यात आले होते. त्यामुळे आता जयपूर शहर आणि आसपासच्या भागातील सायकल विक्रेत्यांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

No comments: