शिक्षण खात्याची घोषणा
मडगाव, दि.१२ (प्रतिनिधी) : मडगाव आणि फातोर्डातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील प्रवेशाचा घोळ दूर करण्यासाठी आज आयोजित बैठकीत शिक्षण खात्याच्या संचालकांच्या आडमुठेपणा नडला. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत प्रवेश प्रक्रिया रहीत करण्याची पाळी शिक्षण खात्यावर आली. दुसरीकडे यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंतचे सर्वच प्रवेश रद्द घोषित करून नव्याने केवळ गुणवत्तेच्या निकषावर प्रवेश देण्याची मागणी फातोर्डा नागरिक कल्याण समितीने केली आहे.
गेल्या गुरुवारच्या बैठकीत आज सकाळी ११ वाजता दक्षिण शिक्षण विभागात संयुक्त बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार फातोर्डा कल्याण समितीचे अध्यक्ष सावियो डायस, संजीव रायतूरकर , शिवराम रायतूरकर व अन्य ३० ते ५० लोक सकाळी ११ वाजता शिक्षण विभाग कार्यालयात आले. तथापि, ठरलेली वेळ उलटून गेली तरी शिक्षण संचालिका सेल्सा पिंटो आल्या नाहीत . नंतर खात्याचे प्रशासन उपसंचालक सावंत यांना पाठवल्याचा निरोप आला व ते १२ च्या सुमारास दाखल झाले . मात्र प्रशासान विभागातील अधिकाऱ्याशी आपण बोलणी करणार नाही व फक्त संचालिका आल्या तरच बोलणी करू, असा पवित्रा समितीने घेतला. त्यांनी तेथेच बसकरण मारली. वेळ जाऊ लागला तसे वातावरण तापू लागले. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई पोलिस कुमक घेऊन दाखल झाले.
अखेर दुपारी तब्बल ३ वाजता संचालिका सेल्सा पिंटो दाखल झाल्या .त्यांनी केलेल्या विलंबामुळे त्या करीत असलेली सारवासारव ऐकून घेण्याची कोणाचीच तयारी दिसली नाही. त्यांनी देणग्याबाबत स्पष्ट तक्रार पालक करीत नाहीत, ही पूर्वापार पध्दत आहे, तिला कायद्याने बंदी घालता येणार नाही वगैरे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण समिती आपल्या पवित्र्यावर ठाम राहिल्याने साडेचारच्या सुमारास समितीने केलेल्या देणग्याविषयक तक्रारीच्या अनुषंगाने पहिली ते दहावी पर्यंतच्या प्रवेशाची प्रक्रिया रहीत ठेवण्याची व ७ मे रोजी सादर केलेल्या अहवालावर केलेली कारवाई १० दिवसात कळविण्याचे आश्र्वासन समितीला देण्यात आले. शिक्षण उपसंचालक बी. जी. नाईक यांनी तसे लेखी पत्र समितीला दिले. मात्र समितीने यंदा दिले गेलेले सर्वच प्रवेश रद्द घोषित करण्याचे व गुणवत्तेवर आधारूनच ते देण्याची मागणी केली असून तीवरून शिक्षण खाते अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहे.
दुसरीकडे मडगावातील एक प्रमुख संस्था असलेल्या भाटीकर मॉडेलने खात्याकडून प्रवेशासाठी होणाऱ्या शिफारसींमुळेच देणग्या वगैरे प्रकारांना वाव मिळत असल्याचा आरोप केला आहे.
प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या घेतल्या जात असल्याच्या फातोर्डा नागरी कल्याण समितीने येथील विभागीय साहाय्यक शिक्षण संचालकांकडे केलेल्या तक्रारीची गंभीर दखल शिक्षण खात्याने घेऊन शिक्षण संचालकांनी दक्षिण गोव्यातील सर्व शाळांतील प्रवेश प्रक्रियेला गेल्या गुरुवारी स्थगिती दिली हेाती. यासंदर्भात आज समितीची बैठक दक्षिण गोवा साहाय्यक शिक्षण संचालकांच्या दालनात संचालकांशी ठरली हेाती.
दक्षिण गोवा शिक्षण विभागाने मडगावातील एकूण सहा प्रमुख शाळांतील प्रवेश प्रक्रियेचा तपशील आपला खास प्रतिनिधी पाठवून गोळा केला असता बऱ्याच शाळांतील पद्धतीत विसंगती आढळली. काहींनी प्राथमिक वर्गासाठी फी आकारताना निर्धारीत पद्धत अवलंबली नसल्याचे तर काहींनी वर्गांचे गट पाडताना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. एका नामवंत संस्थेने विद्यार्थ्यांकडून प्रचंड रक्कम गोळा केल्याचे अधिकाऱ्यांना तसेच व्यवस्थापनाने खात्याची परवानगी घेतली नाही की हिशेबही सादर केला नसल्याचे आढळून आले होते.
Tuesday, 13 May 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment