Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 13 May 2008

ब्रह्मानंदाचार्य स्वामी यांची सहावी पुण्यतिथी शनिवारी

कुंडई, ता. १२ : जनकल्याणासाठी जे चंदनाप्रमाणे झिजले व हजारो लोकांच्या संसारात ज्यांनी सुखाचा परिमळ पसरवला त्या परमपूज्य ब्रह्मानंद स्वामी यांचा षष्ठम पुण्यतिथी महोत्सव येत्या शनिवारी (१७ मे रोजी) विद्यमान पीठाधीश ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या मुख्य उपस्थितीत तपोभूमी कुंडई येथे साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त गुरुवार १५ मेपासून गुरुचरित्राचे पारायण केले जाणार असून ते शुक्रवार व शनिवार असे एकूण तीन दिवस सुरू राहणार आहे. एकूण तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता प्रातःस्मरण, त्यानंतर काकड आरती, परमपूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांचे आशीर्वचन, आरती, दर्शन सोहळा आणि महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता होईल. दुपारी ३.३० ते ४.३० या कालावधीत भजन होईल. त्यानंतर ४.३० वाजता प्रगट कार्यक्रम होणार आहे. तसेच शुक्रवारपासून यज्ञ सुरू होणार असून तो शनिवारपर्यंच चालणार आहे.
शनिवारी दुपारी चार वाजता पद्मनाभ संप्रदायाचे प्रचारक पुरोहित महेश आरोंदेकर, ज्येष्ठ पुरोहित महादेव बाणावलीकर, बुधाजी बाणावलीकर, उमाकांत नार्वकर तसेच संप्रदायाचे ज्येष्ठ गुरूबंधू ज्ञानेश्वर साळगावकर व रामदास बाणावलीकर यांना गौरवण्यात येणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व आमदार नीळकंठ हळर्णकर उपस्थित राहणार आहेत.

No comments: