पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): माणसाच्या जीवनात आईवडिलांचे स्थान हे सर्वोच्च आहे. आईवडील आमच्यासाठी जे काही करतात ते अजोड असते. ते ऋण आम्ही कदापि फेडू शकत नाही. मोठ्या मनाने केवळ त्यांचे स्मरण करणे एवढेच आमच्या हाती असते. आम्ही आज जे काही आहोत ते आमच्या आईवडिलांच्या पुण्याईमुळेच आहोत. राजने आपल्या आईवडिलांच्या आठवणीसाठी आज पुस्तक रूपाने व्यक्त केलेले ऋण माझ्या ह्रदयाला भावले. या मनस्वी कृतीमुळे मी सद्गदित झालो. या कृतीतून राजच्या जडणघडणीची झलक दिसून येते, अशा शब्दांत महानायक अमिताभ बच्चन यांनी गोव्यातील आघाडीचे उद्योजक दत्तराज साळगावकर यांचे कौतुक केले. श्री. साळगावकर यांनी प्रकाशित केलेल्या "अपरांत - लॅंड बियॉंड दी एन्ड' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अमिताभ बोलत होते. सभापती प्रतापसिंग राणे याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
मोजक्याच उपस्थितांच्या या छोटेखानी समारंभात हॉटेल मेरियॉटच्या लॉन्सवर गोव्याची प्रतिमा आणि अस्मिता आपल्या कार्यातून ज्यांनी जपली व राखली अशा काही मान्यवरांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला. या मान्यवरांमध्ये रवींद्र केळेकर, मारियो मिरांडा, विसूबाब पाणंदीकर, चंद्रकांत केणी, रेमो फर्नांडिस, इव्हाना फुर्तादो, तियात्र कलाकार प्रिन्स जेकब व उंबेर्तो यांचा समावेश होता. या प्रसंगी बोलताना अमिताभ म्हणाले, माझे आणि गोव्याचे नाते हे खूप जुने. ख्वाजा अहमद अब्बास यांनी गोव्याच्या मुक्तीलढ्यावर आधारीत काढलेल्या सात हिंदुस्थानी या चित्रपटाद्वारे माझी गोव्याशी ओळख करून दिली. अब्बास हे समाजवादी होते, या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी आम्हा कलाकारांना समाजवाद्यांसारखेच जगण्याचे धडे दिले. शुटिंगच्या निमित्ताने आम्ही गोव्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो. गोव्यातील अनेक जंगलांची मला चांगलीच ओळख आहे. गोव्यातील अनेक सरकारी विश्रामगृहे जेथे ना धड पाणी ना धड वीज अशी ठिकाणेही माझ्या परिचयाची आहेत. अनेक रात्री आम्ही केवळ साध्या जमिनीवर झोपून काढल्या. त्या अथक एका महिन्याच्या धावपळीनंतर जेव्हा मी पणजीत पाऊल ठेवले तो क्षण खूपच सुखद होता. ते दिवस खूपच सुंदर होते कारण तेव्हा गोवा अधिक सुंदर, खूप शांत आणि कमी गजबजलेला होता. त्यानंतर अमजद खान यांना झालेल्या जीवघेण्या अपघाताच्या निमित्तानेही गोव्याच्या लोकांशी माझा जवळचा संबंध आला. गोवेकर हे खूप प्रेमळ, विशाल ह्रदयी असल्याचा अनुभव मी त्यावेळीही घेतला. दत्तराज व त्यांच्या कुटुंबाशी माझे खूप जवळचे नाते आहे. आई वडिलांचे आशीर्वाद असेच राजच्या पाठीशी राहतील आणि त्याला याहूनही मोठा करतील.
अमिताभ यांच्या आगमनाने कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळे वातावरणच चैतन्यदायी बनले. बॉलिवूडच्या या बादशहाने एका कोपऱ्यात बसलेल्या पॉपसिंगर रेमो याला पाहिले, तेव्हा स्वतः होऊन ते रेमोच्या जवळ गेले व त्याला प्रेमपूर्वक आलिंगन दिले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अमिताभ वेळेच्या काही मिनिटे आधीच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचले.
दत्तराज यांनी या प्रसंगी सर्वांचे स्वागत करताना, माझ्या वडिलांची ही ब्याणव्वावी जयंती असे सांगून, अशा कुटुंबात जन्म झाला हे मी माझे भाग्य समजतो. वयाच्या दहाव्या वर्षी माझे आजोबा वारले. केवळ स्वकष्टावर वडिलांनी पुढे हा लौकिक मिळवला. माझी आई एक उत्तम गृहिणी व कुटुंब वत्सल होती. तिने आमची चांगली जडणघडण केली. जनमत कौलावेळी गोव्याचे वेगळे अस्तित्व राखण्यासाठी तसेच कोकणीसाठी माझ्या खूप महत्त्वाची भूमिका बजावली. अशा आईवडिलांच्या स्मरणार्थ मी हे पुस्तक त्यांना अर्पण करत असल्याचे सांगितले. या पुस्तकात एकूण एक्कावन लेखकांनी गोव्याशी संबंधित विविध विषयांवर लेखन केले आहे. पां. पु. शिरोडकर, मारिया आवरोरा कुतो, रेमो फर्नांडिस, वेंडल रॉड्रीक्स, मारियो काब्राल ई सा आदींचा त्यात समावेश आहे. प्रख्यात पत्रकार आणि अमेरिकास्थित गोमंतकीय लेखक व्हिक्टर रेंजल रिबेरो यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. सभापती राणे यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा देताना व्ही. एम. व आपले जवळचे नाते होते व गोव्याच्या आर्थिक विकासात त्यांचा मोठा सहभाग असल्याचे नमूद केले. सौ. दीप्ती साळगावकर यांनी उपस्थितांची ओळख करून दिली. दत्तराज यांनी आभार मानले.
Tuesday, 13 May 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment