पंकज शेट्ये
वास्को, ता. १२ : सुनील गावस्कर व रवी शास्त्री यांच्यासारख्या दिग्गजांकडून माझ्या पाठीवर कौतुकाची थाप पडली अन् त्यामुळे अक्षरशः थरारून गेलो, असे गोव्याचा "लिटल मॅन' स्वप्निल अस्नोडकर याने आज सांगितले. दुपारी दीडच्या सुमारास किंगफिशर एअरलाईन्सच्या विमानाने स्वप्निलचे गोमंतभूमीत आगमन झाले. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा हा गुणी गोमंतकीय क्रिकेटपटू देश पातळीवर चमकता सितारा बनला आहे. या प्रतिनिधीशी त्याने दाबोळी विमानतळावर पाऊल ठेवल्यावर दिलखुलास गप्पा मारल्या. गोव्यात सुटी घालवण्यासाठी शेन, वॉर्न, शेन वॉटसन, ग्रॅमी स्मिथ, आदित्य आंगले, रवींद्र जडेजा आदी बडे खेळाडूदेखील दाखल झाले आहेत. त्यांना पाहून विमानतळावरील गर्दीत वाढ होत गेली. ही मंडळी आणखी चार दिवस हॉटेल फोर्ट आग्वादमध्ये गोव्याचा पाहुणचार झोडणार आहेत. नंतर ते जयपूर येथे बंगळूरच्या रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या लढतीसाठी रवाना होतील. सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने आपला जबर दबदबा निर्माण केला आहे. त्यातही स्वप्निलची बॅट तेजाने तळपू लागली आहे. त्यामुळे त्याच्याभोवती आगळे वलय निर्माण होत चालले आहे.
"ही सगळी देवाचीच कृपा म्हटली पाहिजे. मात्र खरे सांगतो, माझे पाय अजून जमिनीवरच आहेत व भविष्यातही ते तसेच राहतील. बंगळूरच्या रॉयल चॅलेंजर्स संघात आधी माझे नाव होते. तथापि, नंतर राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची संधी मिळाली. जे होते ते बऱ्यासाठीच. माझ्या संघाने या स्पर्धेत जोमदार प्रगती केली आहे. लिटल चॅंपियन सचिन तेंडुलकर यानेही माझ्या खेळाबद्दल गौरवोद्गार काढले तेव्हा तर मला स्वर्ग दोन बोटे उरल्याचा भास झाला...' हसतमुख चेहऱ्याने स्वप्निल सांगत होता. कधी एकदा आपल्या कुटुंबीयांना भेटतो आहे असे त्याची देहबोली सांगत होती. तरीसुद्धा वेळात वेळ काढून त्याने "गोवादूत'शी वार्तालाप केला.
Tuesday, 13 May 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment