पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): कर्नाटक राज्याची निवडणूक होताच ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना दिगंबर कामत मंत्रिमंडळात सामावून घेतले जाण्याची शक्यता असून पक्षश्रेष्ठींनी त्यास मान्यता दिल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार फ्रान्सिको सार्दीन यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे एका मंत्र्याला पायउतार व्हावे लागणार असून आता कोणाचे मंत्रिपद जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वेळी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत कॉंग्रेस श्रेष्ठींनी बाबूश यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. कॉंग्रेसने दिलेल्या शब्दाची पूर्तता केली जात असल्याने बाबूशसाठी मंत्रिमंडळातील एकाला जागा खाली करणे भाग आहे. त्यासाठी कोणाचे मंत्रिपद काढावे, हा निर्णय पूर्णतः दिल्लीत घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवून विजयी झालेल्या उमेदवारांना मंत्रिपद बहाल करण्यासाठी निष्ठावंतांना डच्चू देण्याचे प्रकार वाढल्याने कॉंग्रेसअंतर्गत वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रेष्ठींच्या या भूमिकेमुळे अनेक निष्ठावंत हिरमुसले आहेत. म.गो.च्या तिकिटावर निवडून आलेल्या सुदिन ढवळीकर यांना सरकारात घेण्यासाठी डच्चू दिलेल्या कुभांरजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांचा अद्याप विचारच झालेला नाही. मडकईकरांचे वाहतूक मंत्रिपद गेल्यानंतर दिल्लीत जाऊन त्यांनी श्रीमती सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर निष्ठावंतांनी एकत्र येऊन बंडाचे रणशिंग फुंकण्याची तयारी चालवल्याची माहिती मिळाली आहे.
Tuesday, 13 May 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment