Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 16 May 2008

विर्डी धरणाची जागा महाराष्ट्राने बदलली,तेंब येथे प्रकल्प

पणजी, दि. १५ (पणजी): विर्डी धरणासाठीची नियोजित जागा बदलून धरणासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया नव्याने सुरू करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने चालवली आहे.
महाराष्ट्र सरकारने विर्डी येथे नियोजित धरणाचे काम प्रारंभ केल्याने सत्तरी व डिचोली भागातील पुराचा धोका अधिक वाढण्याचा धोका अनेक पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. यासंबंधीची जागा बदलून महाराष्ट्र सरकारने भलतीकडेच काम सुरू केल्याने हा धोका अधिक संभवत असल्याची टीका झाल्याने गोवा सरकारने हस्तक्षेप करण्याचे मान्य केले होते. धरणाच्या जागेसंबंधी गोव्यात विरोध होत असल्याने महाराष्ट्र सरकारने आपणहूनच ही जागा बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. आता हा प्रकल्प दोन डोंगराच्या मधोमध तेंब व ताडीच्या खालचो डोंगर या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची खबर आहे. ६०० मीटर लांबी व ४८ मीटर उंची अशी या प्रकल्पाची व्याप्ती असून १०० हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असून १३२० हेक्टर जमीन या प्रकल्पामुळे ओलीताखाली आणली जाणार आहे. एकूण ४८ कोटी रुपये अंदाजित खर्च या प्रकल्पासाठी नियोजित करण्यात आला असून सावईवाडा येथील केवळ ८ कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असल्याचीही माहिती महाराष्ट्र सरकारच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने यासंबंधी आपल्या हालचाली तेज केल्या असताना गोवा सरकार मात्र अद्याप गंभीर नसल्याचेच चित्र आहे. मुख्यमंत्री व मुख्य सचिव जे.पी.सिंग यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून या प्रकल्पाबाबत हरकत घेतल्याचे जलस्त्रोत्रमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांनी मान्य केले आहे. यासंबंधी पुढाकार घेऊन चौकशी करण्याचे तसेच प्रत्यक्षात या जागेची पाहणी करण्याबाबत मात्र अद्याप काहीच हालचाली झाल्या नसल्याची माहिती मिळाली आहे. सदर प्रकल्पाबाबतचा तपशील महाराष्ट्र सरकारकडे मागवण्यात आला असून त्यानंतरच यासंबंधी विचार करणार असल्याची भूमिका गोवा सरकारने घेतली आहे.
जलसुरक्षाः विद्यमान परिस्थिती व भविष्यातील आव्हाने
म्हादई बचाव आंदोलन संस्थेतर्फे येत्या शनिवार १७ मे रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजता "जलसुरक्षाः विद्यमान परिस्थिती व भविष्यातील आव्हाने' या विषयावर एकदिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे.
जुने गोवे येथील कुंकळ्ळीकर उच्च माध्यमिक विद्यालयात हे शिबिर भरणार आहे. फादर मेवरीक फर्नांडिस यांच्याहस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. पिसफुल सोसायटी ऑफ गोवाचे सचिव कलानंद मणी हे अध्यक्षस्थानी असतील. कवी विष्णू सूर्या वाघ हे "पाणी' या विषयावर कविता सादर करणार आहेत.
म्हादई व विर्डी धरणासंबंधी सद्यःस्थिती, तेरेखोल, शापोरा,बागा,जुवारी,साळ, तळपण, गालजीबाग आदी नद्यांबाबतची माहिती व आव्हानांवर यावेळी चर्चे केली जाणार आहे. जलसुरक्षा हे गोव्यासमोरील मोठे आव्हान असून त्यासंबंधी घेण्यात येणारी काळजी व कृती आराखडा तयार करण्यासंबंधीही यावेळी चर्चा केली जाणार आहे. यावेळी अनेक तज्ज्ञ व पर्यावरणाचा अभ्यास असलेली मंडळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यात डॉ.नंदकुमार कामत, निर्मल कुलकर्णी, प्रा. राजेंद्र केरकर, प्रकाश पर्येकर, डॉ.एडवीन डिसा, राजेश केंकरे, रामदास केळकर,अरुण नाईक,विठोबा बगळी, महेंद्र फळदेसाई, परेश परब, विशांत वझे, शुभदा च्यारी, एम.के.पाटील व इतर अनेक मंडळी सहभागी होणार आहेत. यासंबंधी या शिबिरात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी संस्थेच्या निमंत्रक माजीमंत्री निर्मला सावंत यांच्याशी ९२२१०१३६० या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: