Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 17 May 2008

कॅसिनोविरोधात भाजप तीव्र आंदोलन छेडणार

पावसाळी अधिवेशनात कायदा दुरुस्ती विधेयक
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): गोव्यात "कॅसिनो' विरोधात प्रखर आंदोलन उभारण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. गोवा जुगार प्रतिबंध व नियंत्रण कायद्यात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी १९९६ साली समुद्री "कॅसिनो' जहाजांना परवानगी देण्यास सुचवलेली तरतूद रद्द करून "कॅसिनो' जहाजांना परवानगी नाकारणारे खाजगी विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात सादर केले जाणार आहे.
आज पणजीत भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती दिली. भाजप विधिमंडळ गटाची बैठक झाली असता त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॅसिनो जुगाराला विरोध करणाऱ्या काही बिगरसरकारी संस्थांनी भाजपशी संपर्क साधल्याचेही पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. भाजपतर्फे सादर करण्यात येणाऱ्या या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी चाळीसही आमदारांना विनंती करणारी पत्रे तथा त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे या संस्थांनी सांगितल्याची माहिती पर्रीकर यांनी यावेळी दिली.
पणजीतील 'कॅसिनो' विरोधात धडक
पणजी भाजप युवा मोर्चा तथा मंडळ समितीतर्फे मांडवी तीरावरील कॅसिनोविरोधात येत्या दोन आठवड्यात धडक देणार असल्याची माहिती पर्रीकर यांनी यावेळी दिली. पणजीत कॅसिनो अजिबात खपवून न घेण्याचा पवित्रा भाजपने घेतला असून या कॅसिनो जुगाराचे दुष्परिणाम आता प्रकर्षाने जाणवू लागल्याची अनेक उदाहरणे असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पणजीतील हे आंदोलन अभिनव गांधीगिरी पद्धतीने राबवले जाणार असून येत्या काही दिवसांत त्यांचे स्वरूप स्पष्ट केले जाईल,अशी माहितीही त्यांनी दिली.
बेती जेटीलाही विरोध
बेती-वेरे येथे कॅसिनो जहाजांसाठी खास जेटी बांधण्याच्या हालचाली सुरू असल्याने येथील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध करण्याचे ठरवले आहे. स्थानिक लोकांच्या या आंदोलनाला भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याची घोषणा पर्रीकर यांनी यावेळी केली. येथील स्थानिक लोकांनी उद्या १७ रोजी या भागात जागृती फेरी तथा विरोध फेरी काढण्याचा निर्णय घेतला असून या लोकांच्या आंदोलनात भाजपही सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

No comments: