बाणावलीची ग्रामसभा तुलनेने शांततेत
प्रकल्पांचे परवाने मागे
घेण्याची जोरदार मागणी
सरपंचांवर प्रश्नांचा मारा...
स्वतंत्र आरोग्य केंद्र हवे...
रविवारी पुन्हा ग्रामसभा...
मडगाव, दि.11 (प्रतिनिधी): बाणावलीतील "त्या' तिन्ही वादग्रस्त महाकाय गृहनिर्माण प्रकल्पांना दिलेले परवाने मागे घेण्याची व भविष्यात अशा प्रकल्पांना ग्रामसभेने मंजुरी दिल्याशिवाय ते विचारात देखील घेऊ नयेत, अशी जोरदार मागणी आज बोलावण्यात आलेल्या बाणावलीच्या खास ग्रामसभेत झाली. सरपंच मारिया फर्नांडिस यांनी लवकरच या प्रकल्पांची तपासणी करून नियमभंग झाल्याचे आढळून आल्यास पंचायत उपसंचालकांकडे लगेच तक्रार केली जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या वेळच्या तुलनेत आजची ग्रामसभा शांततेत पार पडली.
बाणावली नागरिक समितीने जंग जंग पछाडल्यामुळे पंचायत मंडळाला ही ग्रामसभा बोलावणे भाग पडले. सभेला अपेक्षेप्रमाणे प्रचंड उपस्थिती होती व तीत मुलांचे प्रमाण अधिक होते. सभेत कोणतीही गडबड माजू नये म्हणून मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
ग्रामस्थांनी आरंभापासूनच महाकाय प्रकल्पांबाबत सरपंचांवर प्रश्नांचा मारा केला. कसलाही अभ्यास न करता व भविष्यकालीन समस्यांचा विचार न करता परवाने दिल्याचे आरोप झाले. त्यातून प्रकरण चिघळत चालल्याचे पाहून सरपंचांनी त्या तिन्ही प्रकल्यांच्या जागेची पाहणी करण्याचा प्रस्ताव मांडला व तो पुढील रविवारी पुन्हा ग्रामसभा बोलावून सभेसमोर ठेवण्याच्या अटीवर मंजूर झाला.
पंचायतीसाठी नव्या स्वतंत्र आरोग्य केंद्राची मागणीही ग्रामसभेने केली. सध्या या क्षेत्रासाठी असलेले आरोग्य केंद्र कासावली येथे आहे. ते पुष्कळच दूर व वाहतुकीच्या दृष्टीने गैरसोयीचे असल्याने या भागासाठी स्वतंत्र आरोग्य केंद्राची मागणी करण्यात आली.
दांडो येथील क्रीडा मैदान प्रकरणीही सरपंचांची कोंडी केली गेली. तथापि, या प्रश्नाबाबत आपल्याला माहिती नसल्याची कबुली सरपंचांनी दिली. त्यानंतर आगामी ग्रामसभेत ही सर्व सविस्तर माहिती ठेवली जाईल असे आश्र्वासन त्यांनी दिले.
या ग्रामसभेला गटविकास कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच आरोग्य खात्याचे अधिकारी हजर होते.
वासुवाडो, बाणावली व सोनिया या तिन्हीकडील महाकाय प्रकल्पांना दिलेले बांधकाम परवाने मागे घ्यावेत, नगरनियोजन खात्यातून या बांधकामाबाबतची सर्व कागदपत्रे मागून घ्यावीत व ती या ग्रामसभेसमोर ठेवावीत व ग्रामसभा घेईल तो निर्णय अंतिम ठरवला जावा अशी अट नागरिक समितीने गेल्या मंगळवारच्या घेरावावेळी घालून तिन्ही प्रकल्पांचे काम बंद ठेेवावे, असे बजावले होते.
मात्र त्या बैठकीत मंत्री मिकी पाशेको तसेच पंचांना उपस्थितांनी विचारलेल्या एकाही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देता आले नव्हते. त्यामुळे त्या सभेत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले होते. त्या तुलनेत आजची ग्रामसभा शांततेत पार पडली.
Monday, 12 May 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment