मगोची कोलांटी - शांताराम नाईक यांना पाठिंबा जाहीर
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी २२ जुलै रोजी होणार्या निवडणुकीसाठी आज भाजपतर्फे आमदार दामोदर नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉंग्रेसतर्फे यापूर्वीच विद्यमान खासदार शांताराम नाईक यांचा अर्ज दाखल झाला आहे व त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारात घटक असलेल्या मगो पक्षाने शांताराम नाईक यांना पाठिंबा देणार नाही, अशी घोषणा दोन दिवसांपूर्वीच केली होती. आज भाजपतर्फे आपला उमेदवारी अर्ज सादर होताच मगोने कोलांटी घेतली व शांताराम नाईक यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले. शांताराम नाईक यांनी राज्यसभा खासदार म्हणून मगोच्या प्रियोळ व मडकई मतदारसंघांत कोणतेच काम केले नाही, असा आरोप पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केला होता. येत्या १९ जुलै रोजी केंद्रीय समितीची पुन्हा बैठक बोलावून पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, आपण उमेदवारी दाखल करताच मगोने आपली भूमिका बदलण्याचे नेमके कारण काय,असा सवाल दामोदर नाईक यांनी केला.
दरम्यान, दीपक ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सदस्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला खरा, परंतु प्राप्त माहितीनुसार त्यांनी केलेली घोषणा केंद्रीय समितीच्या बहुतांश नेत्यांना अजिबात रुचलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आज पर्वरी सचिवालयात आमदार दामोदर नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या प्रसंगी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार फ्रान्सिस डिसोझा व आमदार दिलीप परूळेकर हजर होते.
ढवळीकर बंधूंनी रंग दाखवलाच : दामू
भाजपकडे राज्यसभा निवडणुकीसाठी आवश्यक आमदारांचे संख्याबळ नाही. परंतु, कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसचा उमेदवार बिनविरोध निवडून जाता कामा नये, यासाठीच ही उमेदवारी दाखल केल्याचे आमदार दामोदर नाईक म्हणाले. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारात घटक असलेल्या मगो पक्षाचे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व कदंब महामंडळाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी शांताराम नाईक यांना पाठिंबा जाहीर करून आपला खरा रंग दाखवून दिला, असा जबरदस्त टोला त्यांनी हाणला. सत्तेच्या हव्यासापोटी ढवळीकरबंधूंनी आपली सगळी राजकीय निष्ठा गहाण ठेवली आहे, याचीच प्रचिती या निमित्ताने आली, असेही ते म्हणाले.
मगो पक्षाने आत्तापर्यंत नेहमीच मराठीसाठी लढा दिला. भाषा माध्यमप्रश्नी इंग्रजी प्राथमिक माध्यमाला मान्यता देण्याच्या निर्णयात मगो पक्षाने सहभागी होऊन मातृभाषेचा घात केला आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंचांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची भाषा करणारे ढवळीकरबंधू हे सत्तेसाठी आपल्या कार्यकर्त्यांशी प्रतारणा करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. एकीकडे मगोचे निष्ठावंत कार्यकर्ते मातृभाषेच्या संरक्षणार्थ रस्त्यावर उतरले आहेत तर, त्याच पक्षाचे नेते कॉंग्रेसबरोबर सत्तेचा उपभोग घेत आहेत. सरकारात राहूनच भाषा माध्यमप्रश्नी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर दबाव टाकण्याची भाषा हा निव्वळ ढोंगीपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला. या निमित्ताने त्यांचा ढोंगीपणा उघड झाला हीच समाधानाची बाब आहे, असेही शेवटी आमदार दामोदर नाईक यांनी सांगितले.
Wednesday, 13 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment