मातृभाषाप्रेमींनी जुझे फिलिपांना घेरले
- सरकारी कार्यक्रमावेळी गदारोळ
- काळे बावटे दाखवून निषेध
- पंच सदस्यही रणांगणात
- संगीता परब यांचा धिक्कार
मांद्रे, दि. १२ (प्रतिनिधी): राज्याचे महसूल व नागरी पुरवठा मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांना आज पेडणेवासीयांच्या ‘तिखट स्वाभिमाना’चा पुरेपूर प्रत्यय घेता आला. मांद्रे पंचायतीला आज दि. १२ रोजी भेट देऊन लोकांची गार्हाणी ऐकण्याच्या त्यांच्या तथाकथित कार्यक्रमात जाज्वल्य मातृभाषाप्रेमींनी अभूतपूर्व गदारोळ माजवला. या कार्यक्रमावर बहिष्कार घालून मांद्रे भाषा सुरक्षा समितीने महसूलमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवला. नंतर समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून माजी आमदार संगीता परब यांच्यावरही कडक ताशेरे ओढण्यात आले.
आज सकाळी १०.३०च्या दरम्यान महसूलमंत्री जुझे फिलिप मांद्रे पंचायतीला भेट देणार असल्याने सकाळी ८.३० वाजल्यापासूनच भाषा सुरक्षा मंचाच्या मांद्रे विभागाचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी जमा झाले होते. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. संभाव्य परिणामांची शक्यता लक्षात घेऊन सरकारने येथे मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात केला होता. ठीक ११.३० वाजता कडक पोलिस बंदोबस्तात जुझे फिलिप मांद्रे पंचायत आवारात दाखल होताच तिथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मातृभाषाप्रेमींनी हातात काळे बावटे घेऊन त्यांचा निषेध केला. यावेळी त्यांनी दिलेल्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. समितीच्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा महसूलमंत्र्यांकडे वळवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी कडे करून दोरखंडाच्या साह्याने त्यांना रोखले. आक्रमक झालेल्या समितीच्या सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत मांद्रेवासीयांच्या स्वाभिमानाला ठोकर लगावलेल्या महसूलमंत्र्यांना जाब विचारणारच, असा पवित्रा घेतल्याने शेवटी पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी त्यांना कार्यक्रमात कोणतीही गडबड करणार नाही या अटीवर तिथे जाण्याची परवानगी दिली.
दरम्यान, महसूलमंत्र्यांनी मातृभाषाप्रेमींना टाळून पंचायत कार्यालयात धाव घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार संगीता परब, मांद्रे सरपंच रक्षा कलशावकर, हरमल सरपंच सौ. सूचना गडेकर व प्रशासकीय अधिकार्यांची उपस्थिती होती. भाषा सुरक्षा समितीच्या वतीने पंच तथा समिती सदस्य राघोबा गावडे व जगन्नाथ पार्सेकर यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन महसूलमंत्र्यांना जाब विचारला. सर्वत्र भाषाप्रश्नी रान पेटले असताना सरपंच सौ. रक्षा कलशावकर यांनी सरकारी कार्यक्रमात सहभाग नोंदवून समस्त मांद्रेवासीयंाचा अपमान केला असल्याचा आरोप, जगन्नाथ पार्सेकर यांनी यावेळी केला. लोकभावना अधिक महत्त्वाची की सरकारी कार्यक्रम याचा त्यांनी खुलासा करावा अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी रक्षा कलशावकर यांनी आपण मातृभाषेच्या चळवळीत सहभागी असून केवळ महसूलमंत्र्यांच्या स्वागतासाठी सरपंच म्हणून व्यासपीठावर उपस्थिती लावली अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला व नंतर त्या आंदोलकांना येऊन मिळाल्या.
परब यांची दुटप्पी भूमिका
दरम्यान, मातृभाषाप्रेमींनी धारण केलेला रुद्रावतार पाहून संगीता परब यांनीही आपला भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. महसूलमंत्री आपल्या पक्षाचे प्रतिनिधी असल्यानेच आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यानंतर हा कार्यक्रम आटोपता घेऊन महसूलमंत्री परतत असताना मातृभाषाप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी करूनच त्यांना निरोप दिला.
‘मांद्रेवासीयांच्या हक्कांवर गदा’
दरम्यान, महसूलमंत्र्यांनी पोलिस बळाचा वापर करून मांद्रेतील भाषाप्रेमींचे न्याय्य आंदोलन चिरडण्याचा अश्लाघ्य प्रकार केला आहे. हा प्रकार म्हणजे मांद्रेवासीयांच्या हक्कांवर गदा आणल्यासारखेच आहे. त्यामुळे या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत, अशी प्रतिक्रिया भाषा सुरक्षा समितीने नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. मांद्रेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रकार आहे. यापुढे असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला समितीच्या कार्यकर्त्यांसोबत मांद्रेच्या सरपंच सौ. कलशावकर, उपसरपंच सौ. संजीवनी बर्डे, अन्य पंच सदस्यांचीही उपस्थिती होती. यावेळी पंचायत मंडळाच्या आडून सरकारी कार्यक्रम करू पाहणार्यांना योग्य अद्दल घडवली जाईल, असा इशारा देण्यात आला. यापुढे मांद्रे पंचायत मातृभाषाप्रेमींच्याच बाजूने उभी राहील, अशी ग्वाही सौ. कलशावकर यांनी दिली.
संगीता परब यांचा धिक्कार
एका बाजूने मातृभाषेला समर्थन द्यावे तर दुसर्या बाजूला जे या सरकारी निर्णयाविरोधात चकार शब्दही उच्चारत नाहीत अशा मंत्र्यांची व्यासपीठे भूषवावीत ही संगीता परब यांनी कृती पूर्णपणे दुटप्पी आहे. त्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका यावेळी राघोबा गावडे, जगन्नाथ पार्सेकर, महेश कोनाडकर यांनी केली. आजचा कार्यक्रम आयोजित करून संगीता परब यांनी मतांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यापुढे त्यांनी आपल्या कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्नही करू नये, असा इशारा पंच नीलेश आसोलकर यांनी दिला.
Wednesday, 13 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment