Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 12 July 2011

मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा उपनिरीक्षक

प्रसन्न भगत निलंबित
बचावलेल्या विद्यार्थ्यांकडून १.३० लाखांची उपटली रक्कम

मडगाव, दि. ११(प्रतिनिधी): गेल्या शुक्रवारी काब द राम येथे समुद्रात बुडून मृत्यू आलेल्या विद्यार्थ्यांच्या सहकार्‍यांकडे दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप झालेले कुंकळ्ळीचे पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न भगत यांनी या दुर्घटनेतून बचावलेल्या अन्य चार विद्यार्थ्यांना खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्याची धमकी देऊन १.३० लाख रुपये त्यापूर्वीच उकळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस महानिरीक्षकांनी आज त्यांना तडकाफडकी निलंबित केले. त्यांच्या खातेनिहाय चौकशीचा आदेशही त्यांनी दिला.
अपघाती मृत्यू आलेल्या प्रकरणातही संबंधितांचा पोलिस अधिकारी कसा मानसिक छळ करतात हे या प्रकरणातून सिद्ध झाले असून त्यामुळे या खात्याबाबत आज येथे संतापाची लाट पसरलेली आढळून आली.
शुक्रवारी दुपारी ती दुर्घटना घडली होती. सायंकाळी एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला होता तर दुसरा बेपत्ता होता. त्या दुर्घटनेतून बचावलेल्या सर्वांना कुंकळ्ळी पोलिसांनी ठाण्यावर आणून चौकशीच्या नावाखाली बसवून ठेवले. रात्री उशिरा त्यांचे पालक आले व अल्पवयीन मुलांना तुम्ही कसे ठेवणार, असा प्रश्‍न त्यांनी केला. तेव्हा पोलिसांनी त्यांना तेव्हा जाऊ दिले पण, दुसर्‍या दिवशी परत बोलावले. भगत याने पहिल्या दिवशीच या बचावलेल्या विद्यार्थ्यांना, तुम्हीच मृतांना पाण्यात ढकललेत त्यामुळे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करून तुम्हांला अडकवतो, अशी भीती दाखविण्यास सुरुवात केली होती. बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याला कुठे दडवून ठेवले आहे ते सांगा असा आग्रहही त्यांनी धरला होता.
दुसर्‍या दिवशी त्याने त्याच धमकावणीच्या सुरात चौकशी सुरू केली तेव्हा त्याच्याच एका हस्तकाने प्रत्येकी २५-२५ हजार चुकते करा व प्रकरण मिटवा; अन्यथा खडी फोडायला जाल अशी भीती घातली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष प्रसन्न याच्याशी बोलणी करून सायंकाळी ६ वाजेपर्यंत रक्कम आणून देण्याचे मान्य केले तर एकाने कुंकळ्ळी येथील एटीएममधून पैसे देण्याची तयारी दर्शवली. ते पैसे नेण्यासाठी भगत स्वतः पांढरी गाडी घेऊन आला व ती रक्कम आपण गाडीच्या मागच्या सीटवर ठेवल्याचे एका विद्यार्थ्याने पोलिसांत दिलेल्या जबानीत म्हटले आहे. पुराव्यादाखल त्याने एटीएममधून पैसे काढल्याची पावतीही सादर केली आहे.
आता उघडकीस आलेल्या माहितीप्रमाणे, भगत याने अन्य तिघांकडून त्यापूर्वीच प्रत्येकी पंचवीस तर एकाकडून ३० हजार रुपये उकळले होते. त्या सर्वांनी तशी जबानी पोलिसांना दिली असून पैसे कुठून उभे केले त्याची माहितीही सादर केली आहे.
मात्र, पाण्यात पडलेल्या एका मुलीला वाचविणार्‍या जेसन गोयस या मालभाटमधील विद्यार्थ्याकडूनही त्याने याच मार्गाने पैसे उकळण्याचा प्रयत्न केला व तोच त्याच्या अंगलट आला. त्यालाही त्या दिवशी भगतने चौकशीच्या नावाखाली उशिरापर्यंत पोलिस स्टेशनवर बसवून ठेवले व नंतर जाऊ दिले. पण शनिवारी पुन्हा बोलावले व त्यावेळी त्याला, तूच या दुर्घटनेस जबाबदार असल्याने तुझ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला जाईल, असे धमकावले. या प्रकरणातून मोकळे व्हायचे असेल तर दहा हजार रुपये घेऊन ये, असेही त्यांनी सांगितले.
तेथून बाहेर पडलेल्या जेसन व त्याच्या आईने थेट पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांच्या कानावर ही सारी हकिकत घातली त्यांनी लगेच कुंकळ्ळी पोलिस स्थानक निरीक्षकांशी संपर्क साधला. जेसन याला या प्रकरणी रीतसर तक्रार देण्यासही सांगितले. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनीही चौकशीचा आदेश दिला होता.
आता बाहेर आलेल्या माहितीनुसार, दुर्घटना झाली तो एकच गट असला तरी भगत याने त्यातील विद्यार्थ्यांना चौकशीसाठी वेगवेगळे बोलावून आपले ईप्सित साध्य करण्याचा बेत आखला होता. त्यामुळे एकाकडून घेतलेल्या रकमेचा पत्ता दुसर्‍याला लागला नाही. मात्र, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा हे एकच हत्यार त्याने सर्वांसाठी वापरले व तेच त्याच्या अंगलट आले.
भगत याच्यावर काब द राम येथे दोन वर्षांपूर्वीच्या अशाच एका प्रकरणात दवर्लीतील एकाकडून पन्नास हजारांची लाच घेतल्याचाही आरोप आहे.

No comments: