पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): कॉंग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार शांताराम नाईक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आघाडीतील सर्व घटक पक्षांचा आपल्याला पाठिंबा असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आज सकाळी पर्वरी सचिवालयात शांताराम नाईक यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री दिगंबर कामत, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, उपसभापती माविन गुदिन्हो, राष्ट्रवादीचे नेते तथा महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा तसेच अन्य मंत्री व कॉंग्रेसचे आमदार हजर होते. उद्या १२ रोजी संध्याकाळी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. विरोधी भाजपतर्फे अद्याप उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. आमदार दामोदर नाईक यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी उद्या १२ रोजी भाजप आपली भूमिका स्पष्ट करेल,असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर म्हणाले. मगो पक्षाने शांताराम नाईक यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला असला तरी या पक्षाचे दोन्ही आमदार विद्यमान आघाडीचे घटक असल्याने त्यांचा पाठिंबा आपल्यालाच मिळेल, असे शांताराम नाईक म्हणाले.
खासदार शांताराम नाईक यांची उमेदवारी सरकार पक्षातील सगळ्याच सदस्यांना मान्य आहे असे नाही व त्यामुळे सत्ताधारी गटांतून सहा ते सात मते मिळवण्याची एखाद्याची तयारी असेल तर त्याला भाजप पाठिंबा देण्याची शक्यता श्री. पर्रीकर यांनी बोलून दाखवली.
Tuesday, 12 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment