पर्रीकरांचा विश्वजितवर पलटवार
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): म्हापसा जिल्हा इस्पितळाचे ‘पीपीपी’ करण सर्वसामान्य जनतेच्या हिताचे नाही व या व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आपण केला होता. परंतु, या आरोपांवरून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जी आदळआपट केली त्यावरून ‘खाई त्याला खवखवे’ या उक्तीचा प्रत्ययच त्यांनी आणून दिला, असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज लगावला.
भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणातील भानगडींवर आपण बोट ठेवले होते. हा गैरव्यवहार कुणी केला हे मात्र सांगितले नव्हते. पण, विश्वजित राणे यांनी स्वतःहूनच या गैरव्यवहारांत आपला हात असल्याचे दाखवून दिले आहे. जुने आझिलो इस्पितळ कोसळण्याच्या मार्गावर आहे. तेथील रुग्णांची दयनीय परिस्थिती पाहता या इस्पितळाचे तात्काळ नव्या इमारतीत स्थलांतर होण्याची गरज आहे. या धोकादायक परिस्थितीची कोणतीच काळजी नसलेले आरोग्यमंत्री ‘पीपीपी’साठी अट्टहास धरून बसले आहेत व त्यामुळे या व्यवहारात त्यांचा स्वार्थ असल्याचेच दिसून येते, असा आरोपही पर्रीकर यांनी केला. सर्वसामान्य जनतेला मूलभूत आरोग्य सेवा प्रदान करण्यास अपयशी ठरलेल्या आरोग्यमंत्र्यांना या पदावर राहण्याचा कोणताच अधिकारी नाही, असेही ते म्हणाले.
जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणात सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. राज्य सरकारच्या ‘पीपीपी’ विभागाचे अधिकारीही या गैरव्यवहाराला तेवढेच जबाबदार आहेत. जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणासाठी सुरुवातीला प्रस्ताव मागवताना केंद्रीय आरोग्य योजनेच्या २००७ च्या उपचार शुल्कांची यादी दिली होती. प्रत्यक्षात निविदा सादर झाल्यानंतर २०१० च्या नव्या दरांप्रमाणे उपचार शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरांत बरीच तफावत असल्याने ही बेपर्वाई जाणीवपूर्वक करण्यात आल्याचीच अधिक शक्यता आहे, असे पर्रीकर म्हणाले. केंद्रीय आरोग्य योजनेचे उपचारांसाठीचे शुल्क दर ‘पॅकेज’ पद्धतीचे आहेत व त्यामुळे राज्य सरकारतर्फे औषधांचा वेगळा पुरवठा करण्याचे प्रयोजन काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला. बांबोळी येथे दंत महाविद्यालयाची जागा एका खाजगी कंपनीला सुपर स्पेशलिटी इस्पितळ उभारण्यास दिली आहे. पण, त्याचे काम अजूनही सुरू झालेले नाही. जिल्हा इस्पितळाला पर्यायी इस्पितळाचा दर्जा देण्यात आला असला तरी त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आपल्या हातात ठेवून दबावतंत्राची वाट मोकळी करून ठेवली आहे, असेही पर्रीकर म्हणाले.
वाळपईत ‘पीपीपी’ करा
विश्वजित राणे यांना ‘पीपीपी’ची एवढीच घाई झाली असेल तर त्यांनी वाळपई इस्पितळाचे ‘पीपीपी’करण करावे, असेही पर्रीकर म्हणाले. जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणामुळे सरकारवर दरवर्षी अतिरिक्त ४० ते ४५ कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे व त्यामुळे हा पांढरा हत्ती ठरण्याचीच जास्त शक्यता आहे, असेही ते म्हणाले. केवळ ऐच्छिक प्रकल्पांचेच ‘पीपीपी’ करण करण्याची मुभा आहे. पण, इथे अत्यावश्यक आरोग्यसेवेचे ‘पीपीपी’करण करून विश्वजित राणे आरोग्य क्षेत्राचा बट्याबोळ करण्यास पुढे सरसावले आहेत, असा आरोपही पर्रीकर यांनी केला.
Tuesday, 12 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment