Monday, 11 July 2011
विठ्ठल नामे आज दुमदुमणार पंढरी
आषाढी एकादशीदिनी आज भक्तांचा महापूर
गोव्यातही भक्तीला उधाण
पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
हिंदू समाजातील थोर संतमंडळींनी ज्या पांडुरंगाचे गुणगान गात आपल्या वारकरी संप्रदायाची पताका भारतभर फडकावली त्या श्री विठ्ठलाच्या चरणी पंढरपुरात उद्या लाखो भक्तांचा महापूर लोटणार आहे. कारण सोलापूर जिल्ह्यातील श्री पंढरपूर क्षेत्र येथील सर्वांत मोठा उत्सव असलेला ‘आषाढी एकादशी’ सोहळा आज साजरा होत आहे.
श्री कृष्णाचा अवतार असा उल्लेख संतमंडळींनी ज्या रखुमाईवराचा केलेला आहे त्या विठुरायाच्या भक्ताच्या भक्तीला तोड नाही. भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या तीरावर भक्त पुंडलिकाच्या सान्निध्यात देशाच्या कानाकोपर्यातून आलेले विठ्ठलभक्त जातीपातीच्या, भाषांच्या भिंती तोडून उद्या सावळ्या विठ्ठलाचा गजर करत ‘विठ्ठलाच्या पायी भक्तीचे स्वर्गीय सुख’ अनुभवणार आहेत. टाळ मृदंगाच्या जयघोषात पाऊस वार्याची तमा न बाळगता गेले कित्येक दिवस पायी पंढरपूरला आलेली संत तथा भक्त मंडळी ‘आनंदाचे डोई आनंद तरंग’ होऊन जाणार आहेत. महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून तसेच कर्नाटक व गोवा याचबरोबर भारतील अनेक राज्यातून दरवर्षी पंढरपुरात येणारे ‘वारकरी’ आजचा दिवस ‘सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला’ म्हणून जीवनाचे सार्थक करून घेणार आहेत. वारकर्यांच्या दिंड्या ‘जय हरी विठ्ठल’ आणि ‘विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला’ म्हणत गुढ्या व भगवे झेंडे आसमंतात उंचच उंच फडकत श्री विठ्ठल, राही व रुक्मिणी यांचा जयजयकार करणार आहेत. आणि ‘पुंडलीक वर दे हरी विठ्ठल’च्या नादाने भीमातीर मंत्रमुग्ध होणार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास, संत जनाबाई आदी महान संतांनी रचलेल्या अभंग व कवनांनी सारे पंढरपूर एका वेगळ्याच वातावरणात वावरणार आहे.
१२ व्या शतकात स्थापन झालेल्या वारकरी संप्रदायाची मोहिनी गोव्यातसुद्धा अनेक भक्तांवर आहे. गेल्या काही वषार्ंपासून मुळगाव व माशेल येथून पायी पंढरपूरला जाणार्या पथकांना मोठ्या प्रमाणात भक्तांचा पाठिंबा लाभत आहे. तसेच वैयक्तिकरीत्या दर आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी व अन्य प्रकारे जाणारे अनेक भक्त गोव्यात आहेत.
उत्तर गोव्यातील साखळी येथील श्री विठ्ठल मंदिर हे गोव्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. उद्याच्या दिवशी साखळीतील श्री विठ्ठल मंदिरात अनेक भक्त श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेण्यास येणार आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment