Monday, 11 July 2011
कालका मेलला भीषण अपघात १५ डबे रुळावरून घसरले
३५ ठार, २०० जखमी
फतेहपूर, द. १०
हावड्याहून नवी दिल्लीकडे जात असलेल्या भरधाव कालका मेलचे १५ डबे रुळावरून घसरून झालेल्या भीषण अपघातात किमान ३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २०० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
आज दुपारी १२.२० च्या सुमारास कालका मेल लखनौपासून १२० किमी अंतरावर असलेल्या मालवा रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली असताना हा भीषण अपघात झाला. कालका मेलचे १५ डबे रुळावरून घसरले असून, त्यापैकी १० डब्यांची अवस्था भीषण आहे. अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांना या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे उत्तर-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एच. सी. जोशी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. अपघात झाला त्यावेळी ही गाडी पूर्ण वेगाने म्हणजेच ताशी १०८ किमी वेगाने धावत होती. या भीषण अपघातात आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २०० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत, अशी माहिती फतेहपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी के. एन. जोशी यांनी दिली. चालकाने आपात ब्रेक लावल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच मदत पथकांना ताबडतोब घटनास्थळी रवाना करण्यात आले. मदत पथकातील कर्मचार्यांना अपघातग्रस्त दोन डब्यांमध्ये अजूनपर्यंत प्रवेश करता आलेला नाही, तसेच मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही जास्त समावेश असल्याचे फतेहपूरचे पोलिस अधीक्षक राम भरोसे यांनी सांगितले. अपघातग्रस्त गाडीचे काही डबे अक्षरश: एकमेकांवर चढले, तर काही डब्यांचा पूर्णपणे चुराडा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अजूनही अनेक प्रवासी डब्यांमध्ये अडकून पडले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले. या कामासाठी लष्कराचीही मदत घेण्यात येत आहे.
या भीषण अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, बचाव आणि मदत कार्यासाठी शक्य त्या सर्व पर्यायांचा उपयोग करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत.
या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख, गंभीर जखमींना एक लाख व जखमींना प्रत्येकी २५ लाखांची मदतही सध्या रेल्वे मंत्रालयाचा कारभार पाहात असलेल्या पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment