Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 18 April 2010

पेडणेतील जुगाराविरोधी कारवाईचा तपशील द्या

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राने प्रचंड खळबळ
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी पेडणे तालुक्यातील खुलेआम जुगाराबाबत पोलिस खात्याने काय कारवाई केली याबाबतचा सखोल अहवाल उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे मागितल्याने जुगारवाल्यांत प्रचंड खळबळ उडाली आहे. "मांद्रे सिटीझन फोरम' तर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनास अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी हा अहवाल मागवल्याची माहिती मिळाली आहे. या आदेशामुळे पेडणे पोलिसांचे धाबे दणाणले असून त्यांनी पेडण्यातील जुगाराविरोधात जोरदार मोहीम उघडल्याचे वृत्त आहे.
"मांद्रे सिटीझन फोरम'ने पेडणे तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक उत्सव, क्रिकेट स्पर्धा आदींना खुलेआम जुगार चालतो, अशी तक्रार राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांकडे केली होती. जुगार समाजाला कसा घातक आहे, त्याला आळा का बसायला हवा याबाबतही फोरमने जागृती सुरू केली. त्याला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. मांद्रेतील काही समाजिक कार्यकर्ते व समविचारी मंडळींनी फोरमच्या या कार्याचे कौतुक केले. त्यांना पाठिंबा दिला.
"गोवादूत'नेदेखील सातत्याने या मोहिमेचा पाठपुरावा करून फोरमच्या या कार्याला हातभार लावला. तक्रारी करूनही कारवाईच होत नसल्याने फोरमच्या काही कार्यकर्त्यांनी जुगाराचे पुरावेही एकत्र केले. काही सतर्क नागरिकांनी जुगाराचे फोटो व सीडी फोरमकडे सुपूर्द करून त्यांच्या या मोहिमेला पाठिंबा दिला. आता माहिती अधिकाराखाली जुगाराबाबत नेमकी काय कारवाई झाली याचा तपशील मिळवण्यासाठी
अर्ज सादर करण्याची मोहीम सुरू झाल्याने या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.
पेडण्यातील जुगार व्यावसायिक त्यामुळे "दुखावले' गेल्याने त्यांनी सध्या फोरमच्या सदस्यांवर दबाव आणण्याचे किंवा त्यांच्या घरी अकस्मात भेट देऊन त्यांना सतावण्याचे सत्र आरंभले आहे. पेडणे पोलिसांनी फोरममुळे जुगार बंद झाला,असे सांगितल्याचेही हे लोक सांगत सुटले आहेत.
जुगार खेळणे हा कायद्याने गुन्हा आहे. तो बंद करणे पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिस आपली कातडी बचावण्यासाठी आता फोरमचे नाव पुढे करून जुगारवाल्यांना फोरमविरोधात लोकांना भडकावत आहेत. त्यामुळे फोरम सदस्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची तक्रार उपस्थित झाली आहे. पेडणेतून जुगाराचा नायनाट करण्यासाठी सर्व समविचारी, बुद्धिवादी तथा पेडण्यातील स्वाभिमानी लोकांनी फोरमच्या या मोहिमेत सहभागी व्हावे व फोरमला साहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या जुगारामुळे अनेकांचे संसार धुळीला मिळाले आहेत. बेरोजगार युवक जुगाराच्या आहारी गेल्यामुळे
त्यांच्यात व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. जुगारामुळे पोलिसांना मोठ्या प्रमाणात हप्ते मिळतात. त्यामुळे पोलिस जुगारवाल्यांना भडकावून फोरमच्या कार्यकर्त्यांत दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असून हे प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पेडणे तालुक्यातील असंख्य युवा संघटनांनी याविषयावर एकत्र यावे व ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती फोरमने केली आहे.

No comments: