Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 23 April 2010

मंदिरात चोरीप्रकरणी चौघांना अटक

दीड लाखांचा ऐवज हस्तगत
फोंडा, दि.२२ (प्रतिनिधी): माशेल येथील श्री गजांतलक्ष्मी देवालयात झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात फोंडा पोलिसांना अखेर यश प्राप्त झाले असून या संदर्भात चार जणांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश भंडारी (गांधीनगर दावणगिरी), प्रकाश गोसावी (धारवाड), रामू बद्रा गोसावी (धारवाड) आणि सुनील महाबळेश्र्वर रायकर (गांधीचौक धारवाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दिले आहेत.
माशेल येथील श्री गजांतलक्ष्मी देवालयात डिसेंबर २००९ मध्ये चोरी झाली होती. चोरट्यांनी देवालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून देवालयात प्रवेश करून सुमारे २ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज पळविला होता. या संबंधी देवस्थानतर्फे गजानन साळकर यांनी तक्रार दाखल केलेली आहे. फोंडा पोलिस स्टेशन हद्दीत अनेक देवालयात चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा चोरट्यांचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करीत असताना पोलिस हवालदार सावळो नाईक ऊर्फ एम.आर.एफ. याला देवस्थान चोरी प्रकरणातील एक संशयित आरोपी सुरेश भंडारी हा पंडितवाडा अंत्रूजनगर फोंडा येथील झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती मिळाली. हवालदार सावळो नाईक यांनी सुरेश भंडारी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरेश याची चौकशी करीत असताना या प्रकरणात अंत्रूजनगर फोंडा येथे राहणारा प्रकाश गोसावी गुंतलेला असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ताबडतोब प्रकाश गोसावी याला अटक केली. तसेच या प्रकरणात धारवाड येथील रामू गोसावी सहभागी असल्याचे आढळून आल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. संशयितांनी या देवालयातून चोरण्यात आलेले सामान धारवाड येथील मेसर्स रायकर ज्वेलर्स धारवाड याला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी २१ एप्रिल रोजी सकाळी धारवाड येथील स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने मेसर्स रायकर ज्वेलर्सच्या दुकानावर छापा घालून चोरीचा ऐवज जप्त केला आणि दुकान मालक सुनील महाबळेश्र्वर रायकर याला या प्रकरणी अटक केली. देवालयातून चोरीस गेलेले दोन चांदीचे हत्ती, दोन चांदीच्या मूर्ती, चांदीच्या दोन छत्र्या, प्रभावळ, चांदीचा कलश, चांदीची थाळी, पेला आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. हस्तगत करण्यात आलेला सर्व ऐवज गजांतलक्ष्मी देवस्थानातून चोरण्यात आला होता, असे पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी सांगितले. या चोरी प्रकरणाचा तपास प्राथमिक पातळीवर असून संशयितांची या भागातील अन्य चोरीच्या प्रकरणात सुद्धा चौकशी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. या चोरीचा छडा लावण्यास हवालदार सावळो नाईक याच्या बरोबरच उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, कॉन्स्टेबल राजेश नाईक, सतीश पिल्ले, सत्यम मिलापुरे, उदय बोरकर यांनी परिश्रम घेतले. निरीक्षक म्हार्दोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आमोणकर तपास करीत आहेत.

No comments: