मुशर्रफ संकटात!पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी दहशतवाद्यांशी लढा देताना जेवढ्या पाकिस्तानी नागरिकांचे बळी घेतले तेवढे भारताने युद्धातही पाक सैनिकांचे घेतले नसतील, असे जे चित्र पाकिस्तानमध्ये निर्माण करण्यात आले, त्याचा जोरदार फटका मुशर्रफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बसल्याचे मंगळवारी जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. मुशर्रफ यांच्या पक्षाला तिसऱ्या स्थानावर फेकणाऱ्या मतदारांनी आत्तापर्यंतचे त्यांचे वर्तन आणि धोरण यांचा विचार करून त्यांना अक्षरशः नाकारले आहे, असाच याचा अर्थ आहे. पाकिस्तान संसदेतील एकूण जागांची संख्या ३४२ असली तरी प्रत्यक्षात २७२ जागांसाठी मतदान झाले होते. मतदान न झालेल्या ७० जागा या राखीव व अन्य प्रकारच्या असल्याने निकालानंतर मिळणाऱ्या जागांच्या प्रमाणात त्या संबंधित पक्षांमध्ये वाटल्या जाणार आहेत. अर्थात बहुमतासाठी एका पक्षाला दीडशेच्या आसपास जागा जिंकणे आवश्यक होते. सुरवातीचा निकाल पाहाता, दिवंगत नेत्या बेनझीर यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला ८० च्या वर, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम लीगला ७० च्या आसपास जागा मिळाल्या असल्या तरी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा ओलांडता आलेला नाही. मुशर्रफ यांच्या मुस्लिम लीगने तर चाळीसपर्यंतच धाव घेतली. हे बलाबल पाहाता, कोणत्या तरी दोन पक्षांना एकत्र येऊन सरकार बनवावे लागेल. मुशर्रफ यांचे विरोधक असलेले नवाझ शरीफ आणि हत्या झालेल्या बेनझीर यांचा पक्ष एकत्र येतात की राष्ट्राध्यक्षपद भूषविणारे मुशर्रफ हे बेनझीर यांच्या पक्षाशी हातमिळवणी करतात, हे चित्र आज-उद्या स्पष्ट होईलच. अर्थात नवाझ व बेनझीर यांचे पक्ष एकत्र येतील, असा कयास व्यक्त केला जात आहे. असे असले तरी बेनझीर यांची हत्या होण्यापूर्वी मुशर्रफ यांनी त्यांच्याशी संपर्क साधून, त्यांना देशात येण्यास संमती देऊन त्यांच्या पक्षाशी सहकार्य करण्यासाठी पावले उचलली होती. त्यामुळे मुशर्रफ हे आपल्या भवितव्यासाठी त्या पक्षाशी यापुढेही संबंध ठेवतील, असे वाटते. आणखी एक शक्यता नाकारता येणार नाही आणि ती म्हणजे निकालाद्वारे व्यक्त झालेली जनतेची मानसिकता लक्षात घेता दोन्ही विरोधी पक्ष अध्यक्ष मुशर्रफ यांना पदच्यूत करण्यासाठी एकत्रित येतील. तसे झाले तर मुशर्रफ यांना पळता भूई थोडी होईल. त्यांच्यावर संसदेत महाभियोग आणला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुशर्रफ यांच्या पक्षाला बसलेला दणका हा दूरगामी परिणाम करणारा आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी लष्करशहाचे पद खाली केले होते. त्यानंतर देशाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सूत्रे आपल्या हाती ठेवली होती. संसद विरोधकांच्या हातात गेल्यावर त्या पदावर ते कितपत टिकाव धरु शकतील ही शंकाच आहे. मुशर्रफ यांनी न्यायव्यवस्थेवर जो घाला घातला तो जनतेच्या पचनी पडू शकला नाही. त्याचबरोबर आणीबाणी लादून एकाधिकारशाहीची आपली वृत्ती त्यांनी कायम ठेवली, तीही जनतेला आवडली नाही. देशात झालेली चलनवाढ, अन्नाची टंचाई आणि गरीबाने गाठलेले शिखर यामुळे जनतेमध्ये असंतोष धुमसत होताच. त्यातच देशात अनेक वर्षानंतर परतलेल्या नेत्या बेनझीर भूत्तो यांची २७ डिसेंबरला हत्या झाली. त्यामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा लाभ पीपल्स पार्टीला निश्चितच झाला. हा पक्ष त्यामुळेच क्रमांक एकवर येऊ शकला. नवाझ शरीफ यांच्या पक्षाला मिळालेले यश थोडेसे अनपेक्षित आहे खरे पण त्यांनी पाकिस्तानात प्रवेश करताच, मुशर्रफ यांच्या अरेरावीला विरोध केला आणि न्यायव्यवस्थेवरील आक्रमणाचाही निषेध केला होता, त्याचा लाभ त्यांना झाला असणे शक्य आहे. लष्करशहाच्या विरोधात दोन पक्षांना मिळालेले यश जनतेच्या भावना स्पष्ट करणारे आहे. या भावनांची दखल हे पक्ष घेतात की अध्यक्षांच्या तालाने वागतात, हे लवकरच दिसून येईल. एक मात्र खरे की मुशर्रफ यांना नमते घेण्याची वेळ पाकिस्तानी जनतेने आणली आहे. त्यांचा दहशतवादविरोधी लढा जनतेला मानवला नाही की त्यांची समन्वयवादी भूमिका जनतेला आवडली नाही, हे हळुहळू उघड होणार आहेच. मुशर्रफ यांचे घडे भरल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्यातून ते कसा मार्ग काढतात, त्यांचा मित्रदेश असलेला अमेरिका त्यांना कसा सावरतो, हेही दिसेल. उगवत्या सूर्याला नमस्कार करताना आता नव्या सत्ताधीशांना आपल्यामागे नेण्याचा डाव अमेरिका खेळू शकेल.
परवेज मुशर्रफ यांनी जर तात्काळ राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही तर पाकिस्तानमध्ये इराणसारखी क्रांती होण्याची शक्यता कुणीही नाकारू शकणार नाही, असा इशाराच आयएसआयचे माजी प्रमुख हमीद गुल यांनी दिला आहे.लष्करी जवान आणि लोकांमध्ये रस्त्यावर रक्तरंजित संघर्ष व्हावा असे वाटत असेल तर मुशर्रफ यांनी पद सोडावे, नपेक्षा देशात यादवी माजेल. १९७९ मध्ये शाह यांच्या राजवटीविरुद्ध इराणमध्ये ज्याप्रमाणे क्रांती घडविण्यात आली होती तशी क्रांती पाकमध्ये घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे गुल यांनी म्हटले आहे, त्यामुळे
पाकिस्तान सध्या इराणसारख्याच क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. मुशर्रफ यांच्याबाबत प्रचंड रोष असलेले वकील, विद्यार्थी हेच हातात शस्त्र घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Wednesday, 20 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment