बाबूशना सात दिवसांची पोलिस कोठडी
जेनिफरचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी
५०० जणांविरुद्ध गंभीर गुन्हे
सांतिनेज, ताळगावात पूर्ण बंद
पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- पणजी पोलिस स्थानकावर काल झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कल्पना गावस यांनी ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना आज सात दिवसांची पोलिस कोठडी, तर त्यांची पत्नी जेनिफर यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी बाबुश व समर्थकांविरुद्ध पोलिसांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
हनुमंत फकिरप्पा, मायकल आग्नेलो फर्नांडिस, प्रकाश खोडकुडोली व बालाजी कृष्णाजी गडकरी या बाबूश समर्थकांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. दरम्यान, रायन गुदिन्हो या युवकाला आपल्या वाहनातून पोलिस स्थानकात आणलेल्या इम्तियाज शेख व पावलो डिक्रुझ यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. बाबूश यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज ताळगावात बंद पाळण्यात आला.
पणजी पोलिस स्थानकावर बाबूश मोन्सेरात यांनी नेलेल्या मोर्चाला लागलेले हिंसक वळण व त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांकडूनच कायदा हाती घेण्याचा प्रकार याचे गंभीर पडसाद आज राज्यात उमटले. संपूर्ण ताळगावात आज सकाळपासून तणावाचे वातावरण होते. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज संपूर्ण दिवसात एकही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पणजी पोलिस स्थानकावर काल झालेल्या दगडफेकीत २४ पोलिस गंभीर जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. सरकारी सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर गुन्हा हल्लेखोरांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. भा.दं.सं. कलम १४३, १४७, ३२३, ४३५, ३३२, ३३३, ३२४, ३२५, ४२७, ३०७, १४९, १२०(ब) व फौजदारी कलम ३४ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात पणजीचे महापौर टॉनी रॉड्रिगिस, नगरसेवक दया कारापुरकर, उदय मडकईकर, नागेश कारशेट्टी, टॉनी बार्रेटो, ताळगावचे सरपंच जानू रुझारीयो, जे. बी. अँथनी परेरा (खांमो), मिलिंद शिरोडकर, कच्चा नेपाळी, सलिम शेख, सतिश नाईक, संदीप उर्फ बाबू, नारायण, बाच्यो, रायन गुदिन्हो, आग्नेल गुदिन्हो, रोड्नी गुदिन्हो, जॉन, श्रीमती गुदिन्हो यांच्यासह अन्य ५०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आज सायंकाळी ४.३० वाजता बाबूश, जेनिफर व अटकेत असलेल्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनी सादर केलेले जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. बाबूश मोन्सेरात व त्यांची पत्नी जेनिफर यांना न्यायालयात आणले जात असल्याची खबर वाऱ्यासारखी पणजीत पसरल्याने त्यांना पाहण्यासाठी लोकांनी न्यायालयासमोर तुफान गर्दी केली होती. मोन्सेरात यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या अनेक खुणा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होत्या, तर जेनिफर यांना झालेल्या मारहाणीत त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसत होते.
दरम्यान, पणजी पोलिस स्थानकावर प्राणघातक हल्ला करून पोलिस कर्मचाऱ्यांना जखमी करण्याच्या या कृतीची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. येथील स्थानिक गृहखाते केंद्रीय मंत्रालयाशी संपर्क साधून असल्याचेही कळते.
काल रात्री बाबुश समर्थकांची चार वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यात जीए ०१ एच १, जीए ०१ एस ३३३६, जीए ०३ एल ५८५२ व जीए ०८ ए ७८८८ ही वाहने ताब्यात घेऊन पर्वरी पोलिस स्थानकावर ठेवण्यात आली आहेत.
कालच्या हल्ल्यात जखमी झालेल्या २४ पोलिसांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार करुन घरी पाठवण्यात आले. पोलिस शिपाई गौरीश व केंद्रीय राखीव दलातील महिला पोलिस तेजा बडगे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांना बोलता येत नसल्याने त्यांची अद्याप जबानी नोंदविण्यात आली नसल्याचे पोलिस उपअधीक्षक मोहन नाईक यांनी सांगितले.
Thursday, 21 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment