वाहनांची नासधूस, जाळपोळ;
अनेक पोलिस जखमी;
जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर
सर्वत्र दगड, काचांचा खच
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)-काही दिवसांपूर्वी ताळगावात बाबनी शेख यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात हात असल्याचे उघड झालेल्या ताळगाव येथील रायन गुदिन्हो या युवकाला बाबनी टोळीने आज घरातून बाहेर बोलावून मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, त्यामुळे खवळलेले ताळगावचे आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या समर्थकांनी आज रात्री साडेनऊच्या सुमारास पणजी पोलिस स्थानकावर हल्ला चढवून तुफान दगडफेक केली. त्यात अनेक पोलिस जखमी झाले. या जमावाने पोलिस स्थानकाबाहेरील तीन वाहनांची जाळपोळ केली, तर अनेक वाहने उलथवून टाकली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व नंतर अश्रुधुराचा वापर केला. पोलिस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी सर्वत्र दगड व काचांचा खच पडला होता, तर जागोजागी रक्ताचा सडा शिंपला गेलेला दिसत होता. पणजी पोलिस स्थानक परिसराला युद्धभूमीची अवकळा आली होती.
बाबनी शेख व बाबूश समर्थक यांच्यातील वैर आता पुन्हा धुमसू लागल्याने ताळगावात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज तेथील रायन गुदिन्हो या युवकाला बाबनी शेख टोळीने घरातून बाहेर काढून मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ बाबुश समर्थकांनी ताळगाव बंद पाडले. ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाचशे समर्थकांनी यावेळी रायनला मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तिची पूर्तता न झाल्याने पोलिसांवर पक्षपाताचा आरोप करून मोन्सेरात यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. जोपर्यंत पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक यांच्यासह इतर दोन पोलिस शिपायांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी पोलिस स्थानकासमोर ठिय्या दिला.
पोलिस उपअधीक्षक व उपविभागीय अधिकारी मोहन नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबनी शेख याच्यावर ताळगाव येथे झालेल्या जिवघेण्या हल्ल्याप्रकरणी आज पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. या संशयिताकडून बाबनीवर हल्ला करताना वापरलेल्या स्प्रेसंबंधीची माहिती उघड झाली व त्यात रायन याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी रायन याला ताब्यात घेण्यासाठी त्याचा शोध चालवला. रायन आपल्या घरी असूनही पोलिसांना सापडत नसल्याचे इम्तियाज व पावलो याला कळताच त्यांनी बाबनी शेख हल्ला प्रकरणी रायन याचा सहभाग असल्याचा अंदाज लावत रायन याला पोलिसांच्या हवाली करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी रायन याला फोन करून घराबाहेर बोलावले व तो बाहेर येताच त्याला गाडीत कोंबले. रायन आपल्या ताब्यात असल्याची माहिती त्यांनी पणजी पोलिसांना दिली व त्याला ताब्यात घेण्याची विनंती केली. यावेळी वाटेत त्याला पोलिसांच्या वाहनात घेतल्यास येथे वातावरण तापेल, असे म्हणून त्याच गाडीने रायन याला पोलिस स्थानकात पोहोचवण्याचे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनी रायन याला ताब्यात घेतले व त्याला उपचारासाठी गोमेकॉत पाठवले. रायन हा तंदुरूस्त असून त्याला घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिल्याने त्याला परत पोलिस स्थानकात बोलावण्यात आले. मात्र पोलिसांनी रायन याला पकडून देणाऱ्या इम्तियाज शेख व पावलो डिक्रुझ यांना पोलिस स्थानकात ठेवून नंतर बेकायदेशीर जमाव करून मारहाण केल्याप्रकरणी ताब्यात घेतले. याप्रकरणी वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी आपल्या स्वाधीन करून घेतले.
दरम्यान, रायन याने मात्र आपल्या जबानीत दिलेली माहिती एका हिंदी चित्रपटाच्या कथेप्रमाणेच होती. आपल्याला घरी झोपलो असताना "मोबाईल' वरून घराबाहेर येण्यास सांगितले व घराबाहेर न आल्यास घरात घुसून बाहेर खेचण्याची धमकी दिली. यावेळी बाहेर येताच त्यांनी आपल्याला गाडीत कोंबले व दंडुके व सळ्यांनी मारहाण केली. यावेळी तिथे पोलिसांचे वाहन येताच आपण पोलिसांना त्यांच्या वाहनात घेण्याचा आग्रह केला तर पोलिसांनी या लोकांना "तुम्हाला हवे ते करा व पोलिस स्थानकात आणून द्या', असे त्यांना सांगितल्याचे रायन म्हणाला.
बाबनी शेख व पोलिस यांचे साटेलोटे बनल्याने ताळगावात गुंडगिरी वाढत चालली आहे. निरीक्षक सुदेश नाईक हे बाबनी शेख यांचे हस्तक बनल्याने ते इथे राहिल्यास वातावरण अधिक बिघडेल. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी बाबुश यांनी केली. बाबूश यांनी सरकारवरही टीका करून प्रत्यक्षात सरकार अस्तित्वातच नसल्याचा आरोप केला. गृहखाते रवी नाईक यांच्याकडून मुख्यमंत्री कामत यांनी आपल्या ताब्यात न घेतल्यास हा प्रकार सुरूच राहणार असल्याचेही ते म्हणाले. ताळगावातील परिस्थिती हाताळणे पोलिसांना जमत नसल्यास ते काम करण्यास ताळगाववासिय समर्थ असल्याचेही बाबूश म्हणाले.
मोन्सेरात समर्थकांनी ताळगाव बाजार बंद पाडला व पणजी पोलिस स्थानकावर मोर्चा आणला. मोर्चेकऱ्यांनी पणजी पोलिस स्थानकावर दगडांचा वर्षाव केला. स्थानकासमोरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली. अनेक मोटारसायकली उलथून टाकण्यात आल्या. पोलिस स्थानकात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली. यावेळी किमान सात ते आठ पोलिस जखमी झाले. पणजी पोलिस स्थानकासमोर सर्वत्र काचांचा व दगडांचा खच पडला होता. जमाव हिंसक बनल्याने पोलिसांनी लाठीमार केला व तरीही जमाव आटोक्यात येत नसल्याचे पाहून अश्रुधुराची नळकांडी फोडली. या रणकंदनाच्या खुणा रात्री पणजी पोलिस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दिसत होत्या. रात्री सशस्त्र पोलिस दलाचे जवान दोन बसगाड्यांतून ताळगावला रवाना करण्यात आले. ताळगावात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Wednesday, 20 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment