नेरुल ग्रामसभेत
पंचसदस्यांचा गोंधळ "नेरूल बचाव अभियाना"ची
ग्रामस्थांकडून स्थापना
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- नेरूल नागरिक कृती समितीकडून पाणी टंचाईच्या प्रश्नाबाबत पंचायत मंडळाला जाब विचारण्यात आल्याने आज खुद्द पंचायत सदस्यांकडूनच ग्रामसभेत गोंधळ घालण्याचा अजब प्रकार घडला. पाण्याच्या विषयावरून चर्चा करण्याचे सोडून नागरिक कृती समितीच्या सदस्यांवर सत्ताधारी पंच सदस्यांकडून आगपाखड करण्याचा प्रकार घडल्याने यावेळी झालेल्या गोंधळाला आवर घालण्यासाठी मामलेदारांना ग्रामसभा बरखास्त करावी लागली.
ग्रामसभेनंतर या ठिकाणी जमलेल्या लोकांनी ग्रामस्थांचे हित जपण्यात असमर्थ ठरलेले पंचायत मंडळ बरखास्त करून पंचायतीवर प्रशासक नेमावा अशी मागणी केली. यापुढे "नेरूल बचाव अभियान' या नावाखाली ग्रामस्थ आपल्या अडचणी व समस्यांवरून आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला.
नेरूल गावातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर आज ही पहिली ग्रामसभा बोलावण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही सोडवला जात नसल्याने याबाबत जाब विचारण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने ग्रामसभेला उपस्थिती लावली होती. या ठिकाणी गोंधळ होणार असल्याची चाहूल लागल्याने पोलिस फौजफाटाही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.
ग्रामसभेच्या सुरुवातीस जेव्हा सचिव प्रशांत नाईक यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले त्यावेळी गेल्या ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांची नोंद झाली नसल्याचे नेरूल कृती समितीचे निमंत्रक शिवानंद नाईक यांनी त्यांच्या नजरेस आणून दिले. नेरूल भागातील लोकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा व गरजेचा पाण्याचा प्रश्न गेल्यावेळी चर्चेस आला असताना त्याचा उल्लेखही इतिवृत्तात नसल्याने ते संतप्त बनले होते. यावेळी पंचसदस्य संजय कळंगुटकर यांनी "हा प्रश्न नागरिक कृती समितीचे निमंत्रक की ग्रामस्थ म्हणून तू विचारतोस' असा प्रश्न उपस्थित करून श्री.नाईक यांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नागरिक समिती व ग्रामस्थ हे वेगळे नाहीत,असे सांगून पंच सदस्यांकडून जाणीवपूर्वक हा वाद निर्माण केला जात असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी गांेंधळ घालण्याचा प्रकार ग्रामसभेत घडतो परंतु यावेळी मात्र खुद्द सत्ताधारी पंच मंडळाकडून ग्रामसभेत गोंधळ घालण्यात आल्याचा प्रकार घडला अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
हा गोंधळ होताच बार्देश तालुक्याचे मामलेदार गणेश नारूलकर, पोलिस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांनी सभागृहात प्रवेश करून ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वातावरण अधिक तापदायक होणार असल्याची चाहूल लागल्याने मामलेदार श्री.नारूलकर यांनी ग्रामसभा बरखास्त करण्याचे आदेश जारी केले.
यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामस्थांच्यावतीने माजी सरपंच शशिकला गोवेकर,उदय देसाई,शिरू शिरोडकर यांनी सत्ताधारी गटाच्या सदस्यांना चांगलेच धारेवर धरले. गावातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेल्या पंच सदस्यांकडून लोकांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न होतात तेव्हा अशा प्रतिनिधींना सत्तेवर राहण्याचा कोणताच अधिकार नाही,असे सांगून श्रीमती विनंती कळंगुटकर यांनी पंचायत मंडळच बरखास्त करण्याची जोरदार मागणी केली व उपस्थित ग्रामस्थांनी ही मागणी उचलून धरली.
Monday, 18 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment